For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या मनात विष...रामनामाचा द्वेष; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून टीकास्त्र

06:50 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या मनात विष   रामनामाचा द्वेष  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून टीकास्त्र
Advertisement

 : पीलीभीत येथे जाहीर सभा

Advertisement

वृत्तसंस्था/ पीलीभीत

उत्तरप्रदेशातील पीलीभीत मतदारसंघाचे भाजप उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जाहीर सभा घेतली आहे. या सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना जगाकडून मदत मागितली जायची, परंतु आता भारत जगाला मदत करत आहे. आज भारतासाठी काहीच अशक्य नाही असे वक्तव्य मोदींनी केले. तसेच त्यांनी यावेळी राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेसच्या मनात विष भरलेले असून इंडिया आघाडीचे नेते रामनामाचा द्वेष करत असल्याचा दावा केला आहे.

Advertisement

सद्यकाळात जगात भारताचा गौरव होत असून याकरता मोदी कारणीभूत नाही. हे सर्वकाही लोकांच्या एका मतामुळे शक्य झाले आहे. लोकांच्या मतांमुळे एक मजबूत सरकार स्थापन झाले. संपूर्ण जग संकटांमध्ये चाचपडत असताना भारत स्वत:साठी काहीच अशक्य नसल्याचे दाखवून देत आहे. कोरोनाच्या महासंकटात भारताने पूर्ण जगाला औषधे आणि लसींचा पुरवठा केला. जगात कुठेही युद्धाचे संकट आले तर आम्ही प्रत्येक भारतीयाला सुरक्षित परत आणले आहे. अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथसाहिबच्या ग्रंथांना श्रद्धापूर्वक भारतात आणले आणि हे सर्वकाही लोकांच्या मतांच्या शक्तीमुळे घडू शकले असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

शक्तिचा काँग्रेसकडून घोर अपमान

पीलीभीतच्या भूमीवर माता यशवंतरी देवीचा आशीर्वाद आहे. येथे आदि गंगा माता गोमतीचे उगमस्थळ आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिनी इंडिया आघाडीने कशाप्रकारे शक्तिला संपविण्याची शपथ घेतली आहे याची आठवण करून देत आहे. आज देशात ज्या शक्तिची पूजा होत आहे, त्या शक्तिचा काँग्रेसने घोर अपमान केला आहे. ज्या शक्तिसमोर आम्ही नतमस्तक होतो, त्या शक्तिला नष्ट करणार असल्याचे काँग्रेसचे नेते म्हणत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

राम मंदिराला काँग्रेसचा विरोध

आमच्या कल्याण सिंहांनी राम मंदिरासाठी स्वत:चे जीवन आणि सरकार समर्पित केले. देशाच्या प्रत्येक कुटुंबाने स्वत:च्या श्रद्धेनुसार योगदान दिले. परंतु इंडिया आघाडीच्या नेत्यांना राम मंदिर उभारणीबद्दल द्वेष होता आणि आताही द्वेष आहे. अयोध्येत राम मंदिर उभारले जाऊ नये याकरता काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले, परंतु देशातील जनतेने पै-पै जोडून भव्य मंदिर उभारले आणि मंदिर ट्रस्टने इंडिया आघाडीचे सर्व गुन्हे माफ करत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित केल्यावर काँग्रेसने निमंत्रण नाकारत भगवान रामाचा अनादर केला आहे. तर पक्षातील जे नेते या सोहळ्याला उपस्थित राहिले, त्यांची काँग्रेसने हकालपट्टी केल्याची टीका मोदींनी केली आहे.

वृत्ती योग्य तर परिणाम योग्य

जेव्हा वृत्ती चांगली असते, निर्धार ठाम असतो, तेव्हा परिणाम चांगले प्राप्त होतात. आज आम्ही चहुबाजूला विकसित भारताची निर्मिती होताना पाहत आहोत. सप, बसप आणि काँग्रेसच्या शासनकाळात ऊसउत्पादकांना जी रक्कम मिळायची, त्याहून अधिक दर योगी आदित्यनाथ यांचे सरकार येथील शेतकऱ्यांना देत आहे. देशात इथेनॉल ब्लेडिंगवरून मोठी मोहीम सुरू असून याचा पीलीभीतच्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. भाजप सरकारने उसउत्पादकांच्या समस्या कमी करण्यासाठी पूर्ण शक्तिनिशी काम केले आहे. अनेक साखर कारखाने सुरू करण्यात आले असून अनेकांचा विस्तार करण्यात आला आहे. लोकांच्या जीवनाला सुलभ करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण जनसेवा आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.