पोग्बाच्या बंदी कालावधीत कपात
वृत्तसंस्था / लंडन
विश्व चषक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघातील आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटू पॉल पोग्बावर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दल गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण आता या बंदीच्या कालावधीत कपात करण्यात आली असून त्याचा बंदीचा कालावधी आता 18 महिन्यांचा राहिल. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यानंतर पोग्बाने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. या प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यांनी पोग्बाच्या बंदी कालावधीमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आता नव्या निर्णयाप्रमाणे पोग्बावर 18 महिन्यांची बंदी राहिल. या बंदीच्या कालावधीत मार्च 2025 मध्ये संपणार आहे. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पुन्हा आपला सहभाग दर्शवू शकेल. फुटबॉल क्षेत्राच्या इतिहासामध्ये 31 वर्षीय पोग्बा हा सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. 2016 साली मॅचेस्टर युनायटेड क्लबने त्याला 113 दशलक्ष डॉलर्स रक्कमेवर खरेदी केले होते.