मालवणमध्ये मान्यवर कवींची काव्य मैफिल उत्साहात
मालवण | प्रतिनिधी
श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने अभियान आम्ही मालवणी व दत्तमंदिर भरड मालवण यांच्या सहयोगाने कोकणातील मान्यवर कवींची काव्य मैफिल संपन्न झाली. शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी श्री दत्त मंदिर भरड, मालवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्री शिवाजी वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, सुप्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो, प्रा. एल. बी. पाटील, काॅम्रेड गोपाळ शेळके, मच्छिंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. श्री देवी सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच कवी जनार्दन संताने यांनी ईशस्तवन केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर कवींचे गुलाबपुष्प व स्मरणिका देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रा. एल. बी. पाटील यांनी कोमसाप रायगडच्या वतीने डॉ. सुभाष दिघे व रुजारिओ पिंटो यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यानंतर रुजारिओ पिंटो, प्रा. एल. बी. पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, काॅम्रेड ॲड. गोपाळराव शेळके, लवेंद्र मोकल, रामचंद्र म्हात्रे, अजय शिवकर, रमण पंडित, जनार्दन संताने, गजानन म्हात्रे, नरेश पाटील व गोपीनाथ ठाकूर या कवींनी काव्य सादरीकरण केले. यावेळी तुळशीदास पाटील यांनी ढोलकीची साथ दिली.यावेळी मान्यवरांसह ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, चारुशीला देऊलकर, स्मिता बर्डे, वासुदेव काजरेकर, रत्नाकर कोळंबकर, श्रीधर काळे, कमल बांदकर, निशा बिडये, ग्रंथपाल मानसी दुधवडकर, साक्षी सावंत व साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष दिघे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतुजा केळकर यांनी केले.