पुस्तकातील वाक्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात, वाचनाने मिळते भवतालचे भान
कवी गणेश विसपुते यांचे प्रतिपादन ; कै . जयानंद मठकर स्मृती व्याख्यानमाला
सावंतवाडी । प्रतिनिधी
"पुस्तकातील काही वाक्ये आणि अवतरणे जीवनाचे तत्त्वज्ञान आणि अर्थ स्पष्ट करतात. ती आपल्याला भानावर आणून वास्तव जगाची जाणीव करून देतात. त्यामुळे प्रत्येकाने विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे," असे विचार प्रसिद्ध कवी गणेश विसपुते यांनी व्यक्त केले.येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ते 'वाचन आणि भवतालभान' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद घाणेकर होते, तर व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर आणि तानाजी वाडकर उपस्थित होते.कवी विसपुते यांनी आपल्या व्याख्यानात अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकातील महत्त्वपूर्ण वाक्ये आणि अवतरणांचा सखोल आढावा घेतला. त्या वाक्यांच्या आणि अवतरणांच्या माध्यमातून त्या त्या लेखकांना तत्कालीन परिस्थितीत काय सांगायचे होते आणि त्यांचा नेमका अर्थ काय होता, यावर त्यांनी विस्तृत विवेचन केले.ते म्हणाले की, एकेकाळी ग्रंथालये ज्ञानाचे केंद्र होती आणि तेथे सर्वांना सहज प्रवेश मिळत असे. ग्रंथालयात बसून अनेक पुस्तकांचे वाचन करणे शक्य होते. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी भाषांतरित पुस्तके मोठी संधी घेऊन आली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुस्तकांकडे ओढा वाढला होता. पुस्तकांचे वाचन आपल्याला योग्य दिशा दाखवते. पुस्तकातील काही निवडक वाक्ये जीवनाचे सार सांगतात आणि तत्कालीन परिस्थिती आजच्या काळातही उलगडण्यास मदत करतात. कादंबऱ्यांतील प्रभावी ओळी वाचकांच्या मनात कायम घर करून राहतात, तर तुकोबांच्या अभंगांचा आणि पोथ्यांचा वापर आजही आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे केला जातो. ही अवतरणे आणि ओळी केवळ आपल्याला भानावर आणत नाहीत, तर जगाचे वास्तव रूप दाखवतात आणि त्या त्या लेखकांचे विचार व त्यावेळची परिस्थिती आपल्यासमोर जिवंत करतात.प्रत्येक भाषेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आणि ज्ञान असते, असे सांगून विसपुते म्हणाले की, विविध भाषांतील भाषांतरित पुस्तके आपल्याला ज्ञानार्जन करण्यात मदत करतात. प्रत्येक भाषेत एक खास सौंदर्य दडलेले असते आणि हे बहुरंगी सौंदर्य आपल्याला भाषांतरित पुस्तकांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रयत्नांमुळे विविध भाषांतील भाषांतरित पुस्तके उपलब्ध झाली आणि त्यातून वेगवेगळ्या भाषांची ओळख झाली. काहीवेळा भाषांतरे मूळ संहितेपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.जे लोक वाचनापासून दूर राहतात, ते भानावर येत नाहीत आणि म्हणूनच भाषेच्या व धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करतात आणि अस्मितेच्या मुद्द्यांवर हिंसा करतात, असे विसपुते म्हणाले. आपल्या देशातील केंद्रीय मंत्री विशिष्ट भाषा शिकवण्याची सक्ती करतात आणि तसे न केल्यास तामिळनाडू राज्याला १६ हजार कोटींचा निधी देणार नाही, अशी फॅसिस्ट आणि दादागिरीची भाषा वापरतात, जी अपेक्षित नाही. भाषा लादली जाऊ शकत नाही आणि जर ती लादली गेली, तर मूळ भाषा मागे पडते. तामिळनाडूतील अभिजात भाषेचा दाखला देत त्यांनी सांगितले की, या राज्यात दुसरी भाषा लादणे योग्य नाही आणि यापूर्वी भाषेवरून झालेल्या आंदोलनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर पेरियारसारखे नेते तुरुंगात गेले. महाराष्ट्रात हिंदी भाषेचा सहज स्वीकार केला गेला आहे, कारण येथे हिंदी चित्रपट मोठ्या प्रमाणात बनतात आणि ते आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी प्राध्यापक जी. ए. बुवा, संदीप निंबाळकर आणि राम वाचन मंदिराचे कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते. विसपुते यांनी अनेक प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकातील निवडक ओळी आणि अवतरणांचे विस्तृत विवेचन केले, ज्यामुळे श्रोत्यांना वाचनाचे महत्त्व आणि जीवनातील त्याचे स्थान अधिक चांगल्या प्रकारे समजले.