For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडू रालोआत पीएमके सामील

06:46 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडू रालोआत पीएमके सामील
Advertisement

अण्णाद्रमुकचा आघाडीसाठी पुढाकार : आणखी अनेक पक्ष सोबत येणार

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पट्टाली मक्कल काचीचे (पीएमके)  अध्यक्ष अंबुमणि रामदास यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. पीएमकेने अण्णाद्रमुकसोबत हातमिळवणी करत रालोआत प्रवेश केल्याचे अंबुमणि रामदास यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

तामिळनाडूत अण्णाद्रमुक रालोआचे नेतृत्व करते. अंबुमणि रामदास यांनी आघाडीत औपचारिक स्वरुपात सामील होण्यासाठी अण्णाद्रमुक महासचिव ई.के. पलानिस्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. पट्टाली मक्कल काची आमच्या आघाडीत सामील झाली आहे. लवकरच आणखी पक्ष आघाडीत सामील होतील. पीएमकेसाठी जागावाटप निश्चित झाले असून याची माहिती पुढील काळात दिली जाणार असल्याचे पलानिस्वामी यांनी सांगितले आहे.

जनविरोधी सत्तारुढ द्रमुकला पराभूत करण्यासाठी मी रालोआत सामील झालो असल्याचा दावा पीएमके नेते रामदास यांनी केला आहे. रालोआला मजबूत जनादेश मिळेल आणि अण्णाद्रमुक स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास पलानिस्वामी यांनी व्यक्त केला आहे. पीएमके हा पक्ष स्वत:चा संस्थापक डॉ. एस. रामदास आणि त्यांचे पुत्र डॉ. अंबुमणि यांच्यातील सत्तासंघर्षानंतर विभाजित झाला आहे. हा पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी रालोआचा हिस्सा होता. तर तामिळनाडूत यंदा मार्च-एप्रिल महिन्यात विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

द्रमुकवर नाराज तामिळनाडूची जनता

तामिळनाडूची जनता सत्तारुढ द्रमुकवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय यासारखे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत. मागील वेळी विरोधी पक्ष विखुरला गेल्याने द्रमुकला विजय मिळविता आला होता. परंतु आता रालोआत आणखी पक्ष सामील होणार असल्याने आमचे बळ वाढणार असल्याचा दावा अंबुमणि रामदास यांनी केला आहे.

अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांनी सावध रहावे

पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या एजंटपासून सावध राहण्याचा इशारा अण्णाद्रमुक महासचिव पलानिस्वामी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पैशांच्या बदल्यात उमेदवारी मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या एजंट्सना बळी पडू नका असे पलानिस्वामी यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.