For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘दुष्काळग्रस्तांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी मदत करा’; पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन’

02:49 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘दुष्काळग्रस्तांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी मदत करा’  पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन’
Advertisement
पुणे : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव असून राज्य सरकारकडून आगाऊ मदत देण्यात आली आहे. पीएम किसानचा निधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना आश्वस्त केले.

पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. महिला संचालित ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो मार्गिकेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही मार्गिका दुसऱ्या दिवसापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष आवाहन केले.

Advertisement

‘दुष्काळग्रस्तांच्या घरातही दिवाळी साजरी होऊ द्या’

महाराष्ट्रातील दुष्काळाची माहिती असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्य सरकारने आगाऊ मदत दिली असून पीएम किसानचा निधीही जमा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सरकार त्यांच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विसरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. संकटाच्या काळात त्यांच्या घरातही आनंदाने दिवाळी साजरी होण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा. या संकटाचा सामना एकत्रितपणे करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

पुणे मेट्रोमुळे आयटी हबला नवी गती

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या लोकार्पणाबद्दल पंतप्रधानांनी पुणेकरांचे अभिनंदन केले. दहा वर्षांपूर्वी मेट्रोच्या पहिल्या कामाचे लोकार्पण केल्याची आठवण सांगत आता तिसरी मार्गिका सुरू होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या नव्या मार्गिकेमुळे पुण्यातील आयटी क्षेत्राला मोठी मदत होणार असून शहरातील जुने आणि नवे भाग मेट्रोने जोडले जात आहेत. मेट्रोच्या विस्तारामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि नागरिकांना अधिक चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकसित भारताच्या दिशेने पुण्याची वाटचाल

पुणे शहराने देशाला आणि महाराष्ट्राला नेहमीच नवी दिशा दिली आहे. कल्पकता, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत मेट्रोच्या विस्तारामुळे शहराला आणखी गती मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

विकसित भारताच्या संकल्पनेत आधुनिक पायाभूत सुविधांना महत्त्वाचे स्थान असून मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा दर्जा उंचावतो. पुणे मेट्रोचा वाढता विस्तार हा नागरिकांसाठी वेळेची बचत आणि सुविधांमध्ये सुधारणा करणारा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.