पंतप्रधानांना विसरण्याचा आजार आहे काय ? याच सरकारने शरद पवारांना....संजय राऊत यांची खरपूस टिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाऱाष्ट्र दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टिका केली. शरद पवारांचे नाव न घेता शरद पवारांनी कृषीमंत्री असताना काय केले ? असा प्रश्न विचारला होता. पंतप्रधानांच्या या टिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेताना भाजप सरकारनेच शरद पवारांना पद्मविभूषण किताब बहाल केल्याची आठवण करून दिली.
माध्यमांबरोबर बोलताना संजय राऊत म्हणाले, "पवारसाहेब 10 वर्षे कृषिमंत्री होते. ते केवळ कृषिमंत्री नव्हते तर त्यातील एक तज्ञ होते. नविन कृषी क्रांतीसाठी त्यांची ख्याती आहे. पवारांनी स्वबळावर हे स्थान मिळवले आहे. पीएम केअर फंड तयार करणे हे मोठे काम नाही, शरद पवार यांनी त्यांच्या एनजीओद्वारे लोकांना मदत केली आहे.” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले, "मोदी महाराष्ट्रात आले पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काही बोलले नाहीत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आणि मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणावर काही बोलले नाहीत. या दौऱ्यात त्यांचा उद्देश केवळ शरद पवार यांची बदनामी करण्याचा होता."
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपर्यंत म्हणत होते की, शरद पवार त्यांचे गुरू असून त्यांचं बोट पकडूनच राजकारणात आलो आहे. तसेच ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा कृषीमंत्री शरद पवारांनी त्यांना खूप मदत केली. हे सर्व मोदींचेच वक्तव्ये आहेत. मोदींना विसरण्याचा आजार झाला आहे का?”
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना खासदार संजय राऊत म्हणाले कि, "पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी शरद पवारांवर टिका करत होते तेव्हा अजितदादांनी व्यासपीठ सोडायला पाहीजे होते. नाहीतर पंतप्रधान मोदींना योग्य माहिती द्यायला हवी होती जेणेकरून ते स्वताचे विधान दुरुस्त करू शकले असते.मोदींनी आज शरद पवारांवर ही टीका केली, उद्या ते बाळासाहेब ठाकरेंविषयीही असंच बोलू शकतात." असेही ते म्हणाले.
"देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला हे शोभत नाही. कालपर्यंत तुम्ही शरद पवारांची स्तुती करत होता, आज तुम्ही त्यांच्या उणीवा मोजताय, पंतप्रधान मोदींना स्मृतिभ्रंश आहे का? मोदीजी चुकीचे बोलत असताना अजित पवारांनी स्टेज सोडायला हवे होते. आज पीएम मोदी महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर टीका करत आहेत. उद्या ते बाळासाहेब ठाकरेंचाही अपमान करतील. मोदी आणि भाजपला फक्त लोकांना कसे वापरून घ्यायचे ते माहित आहे. त्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणींचा कधीही आदर केला नाही," असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.