लालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पंतप्रधानांवर केलेल्या टिकेनंतर भारतीय जनता पक्षाने मोदी का परिवार ही मोहीम सुरु केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांना परिवार नसल्याचं सांगून त्यांच्या हिंदू असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यानंतर लगेच भाजपकडून मोदी का परिवार' ही एक मोठी ऑनलाइन मोहीम सुरू येऊन अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मोदी का परिवार असा बायो चेंज केला आहे.
बिहारची राजधानी पाटणामध्ये भाजप विरोधी महागठबंधनची माोठी रॅली पार पडली. या रॅलीला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह काँग्रेस आणि सीपीआय तसेच डाव्या पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले कि, "नरेंद्र मोदी यांना परिवार नाही तर आम्ही काय करू शकतो...ते राम मंदीराच्या फुशारक्या मारत आहेत...ते हिंदूही नाहीत...हिंदू परंपरेत आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर डोके आणि दाढीचे मुंढण करणे हि परंपरा आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या मृत्युनंतर तसे केले नाही." असा दावा केला.
लालू प्रसाद यादवांच्या परिवार नसल्याच्या टिकेनंतर भाजपने लगेच मोदी का परिवार ही नविन मोहीम राबवून सहानभुतीचे कार्ड खेळलं आहे. या मोहीमेमध्ये भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मिडीयावरील बायोमध्ये बदल केला आहे. आपल्या नावासमोर मोदी का परिवार अशी माहीती लिहून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा, अनुराग ठाकूर, राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (औपचारिकपणे ट्विटर) वर त्यांच्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ असे जोडले आहे.
लालू प्रसाद यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणातील आदिलाबाद येथील सभेत बोलताना त्यांनी, “मी लालू प्रसाद यांच्या घराणेशाहीच्या राजकारणावर आवाज उठवल्यावर ते म्हणतात मोदींना कुटुंब नाही. माझे जीवन एक खुले पुस्तक आहे...मी माझ्या देशासाठी जगणार आहे." असे आवाहन केले आहे.