महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदींचा काश्मिर दौरा

06:33 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घटनेतील 370 वे कलम रद्द करून जम्मू काश्मिरला पूर्णत: भारताचा अविभाज्य प्रदेश ठरविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच या राज्याला भेट देत असून तिथे ते एका जाहीर सभेलादेखील संबोधित करणार आहेत. जम्मू काश्मिरमधील वातावरण गेल्या तीन वर्षात सुधारतेय. काश्मिर हा भारताचा प्रदेश आहे मात्र कलम 370 अन्वये त्याला एका विशिष्ट प्रदेशाचा दर्जा 50 वर्षांपूर्वी देण्यात आला आणि ते एक स्वतंत्र राष्ट्र वाटावे अशाच पद्धतीने तिथे कारभार चालत होता. केवळ 370 वे कलम व त्या अन्वये त्या राज्याला सर्व नियम वेगळे. तिथे भारतीय ध्वज लावता येत नव्हता. तेथील विधानसभेचा कार्यकाल सहा वर्षांसाठीचा होता आणि तेथील मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याचा दर्जा. या देशातील कोणीही व्यक्ती त्या राज्यात जमिनी खरेदी करू शकत नव्हते. या सर्व परिस्थितीत तेथील बहुसंख्य मुस्लिम नागरिकांचा ओढा पाकिस्तानशी. पाकिस्तानी ध्वज फडकविले जात असत. आणि काश्मिरमधील जवळपास सर्व नेते हे पाकिस्तानधार्जिणे. अनेक वर्षे केंद्रात सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्ष हादेखील कलम 370 च्या बाजूने राहिलेला. भारतीय जनता पक्षाने कोणत्याही परिस्थितीत कलम 370 हटविणारच अशी भिष्मप्रतिज्ञा केली आणि प्रत्यक्षात ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साध्य करून दाखविली. गेल्या तीन वर्षात जम्मू काश्मिर आणि लडाख अशा दोन विभागातून केंद्रशासित प्रदेश केले आणि भारत सरकारचे सर्व नियम लागू करून जम्मू काश्मिरला या देशाचा खऱ्या अर्थाने अविभाज्य प्रदेश करून टाकले. काश्मिरमध्ये आजही सैनिकांचे नियंत्रण आहे. तेथील प्रदेशमध्ये लोकशाही नांदण्यास तेथील काही पाकिस्तानधार्जिणी मंडळी देत नाहीत शिवाय दहशतवाद्यांच्या कारवाया, देशद्रोही मंडळींचा हैदोस अधूनमधून डोके वर काढत आहे. जम्मूमध्ये वातावरण चांगले आहे व हा प्रदेश नेहमीच भारताला जोडलेला होता. वास्तविक हा प्रदेश मोठा असूनदेखील तिथे मतदारसंघाची रचना चुकीच्या पद्धतीने करून काश्मिरचा मुख्यमंत्री हा नेहमीच काश्मिरी मुस्लिम राहील अशा पद्धतीने राष्ट्रीय नेत्यांनी कैक वर्षांपासूनची रचना करून ठेवली होती. आता मोदी-शहांनी हा सारा प्रकार मोडीत काढून काश्मिरला एका बंदिस्त परिस्थितीतून बाहेर काढले व देशातील सर्व नियम हे या प्रदेशाला लागू केले. काश्मिरमध्ये ज्याठिकाणी तिरंगा फडकविता येत नव्हता त्याच काश्मिरमधील सर्व सरकारी इमारतींवर दररोज तिरंगा फडकविला जातोय. काश्मिरला आजवर या देशाने सहन केले. पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांनी तेथील काश्मिरी हिंदू पंडितांची क्रूर हत्त्या केली. हजारो महिला व पुरूषांचा छळ केला, त्यांच्या जमिनी बळकावल्या व या पंडितांना केंद्रातील काँग्रेस सरकारने कधीही न्याय मिळवून दिला नाहीं. जम्मू काश्मिरवरील 370 वे कलम देशासाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनी लावलेला कलंक होता तो कायमचा पुसून टाकला पाहिजे असे जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषित केले होते ते प्रत्यक्षात सरकारने करून दाखविले. आज काश्मिरमध्ये हळूहळू वातावरण बदलतेय. मात्र सीमापारहून येणाऱ्या दहशतवादी कारवाया पूर्णत: आटोक्यात आलेल्या नाहीत. अद्याप तेथील परिस्थिती काहीशी चिंताजनकच आहे. अशा या परिस्थितीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मिर येथे जाऊन श्रीनगरमध्ये असंख्य विकास प्रकल्पांची कोनशिला बसवतील. अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करतील आणि साऱ्या काश्मिरवासियांना दिलासा देतील तसेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला काश्मिरमधील लोकशाही प्रक्रियेची पुनर्स्थापना करतील अशी अपेक्षा आहे. साऱ्या देशाचे लक्ष आज गुरुवार दि. 7 मार्च रोजी काश्मिरमधील श्रीनगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेकडे लागले आहे. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर पंतप्रधानांची आज जाहीर सभा होणार आहे व तिथे भारतीय जनता पक्ष आपले शक्तीप्रदर्शन घडविण्याच्याही तयारीत आहे. 2019 मध्ये 370 वे कलम हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच काश्मिर दौरा आहे. त्यामुळे श्रीनगरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविलेला आहे. काश्मिर दौऱ्यात पंतप्रधान चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील. आजच्या पंतप्रधानांच्या श्रीनगर येथील सभेला 2 लाख नागरिकांना एकत्र आणून जम्मू आणि काश्मिर हा संपूर्ण प्रदेश भारताबरोबरच आहे, परकीय शक्तींना मानत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. काश्मिर हे जगातील सर्वांगसुंदर असे पर्यटन क्षेत्र आहे. इथे सुका मेवा, सफरचंद, विविध दुर्मीळ औषधी, केशर इत्यादींचे उत्पादन होते व जगातील एक नैसर्गिक आणि सर्वांनाच मोहित, आकर्षित करून घेणारे पर्यटनस्थळ आहे. मात्र पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये जे गढूळ वातावरण निर्माण केलेले आहे ते आज 370 वे कलम हटविल्यानंतरदेखील निवळलेले नाही. गढूळ पाणी निवळण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. केंद्रातील भाजप सरकारने या तुरटीचा उपयोग योग्य पद्धतीने केलेला आहे. त्यामुळेच तर गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सध्या काश्मिरमधील परिस्थिती निवळत आहे. काश्मिरमध्ये लोकशाही प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे मात्र त्याकरिता तेथील वातावरणात कमालीचा बदल होणे तेवढेच आवश्यक आहे. एवढी वर्षे अन्याय व अत्याचार सहन करणाऱ्या जम्मूला व तेथील नागरिकांना आतातरी न्याय मिळावा. या दृष्टिकोनातून पावले उचलली गेली पाहिजेत व त्यामुळेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरात दाखल होत काश्मिरच्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करतील. तेथील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ते जरूर पावले उचलतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ज्या काश्मिरी नागरिकांनी भारत सरकारला कधी जुमानायचेच नाही असे ठरविले होते ते एका राजकीय परिस्थितीचा  लाभ उठवित होते. भारत देश ही संकल्पना त्यांना कधी रूचलेली नव्हती यामागील मुख्य कारण होते ते म्हणजे कलम 370. आता तेच हटविल्यानंतर काश्मिरमधील परिस्थितीत फार मोठी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article