For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा

06:58 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा
Advertisement

दोन लाखाची उपस्थिती अपेक्षित, पार्किंगची ठिकाणे निश्चित, एलईडी स्क्रीनचीही सोय

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर व अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि. 28 रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथील मालिनी सिटी येथील मैदानावर सभा होणार आहे. या सभेला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यासह भाजपची राज्यातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी रात्री वास्को-गोवा येथील सभा संपवून ते बेळगावमध्ये रात्री उशिरा दाखल झाले. शहरालगतच्या एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे बेळगावसह राष्ट्रीय महामार्ग परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली येथून आलेल्या एसपीजी कमांडो तसेच राज्य पोलीस दलाकडे देण्यात आली आहे.

सकाळी 10 वाजता मालिनी सिटी येथील जाहीर सभेला सुरुवात होणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रहदारी पोलिसांनी पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणांवरच नागरिकांना वाहनांचे पार्किंग करून चालत सभेच्या ठिकाणी पोहोचावे लागणार आहे. अंदाजे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याने तशा पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. शनिवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करून नागरिकांची कोठेही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली.

पंतप्रधानांचे बेळगावमध्ये पहिल्यांदाच वास्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यापूर्वी अनेकवेळा प्रचार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने बेळगावमध्ये आले आहेत. यापूर्वी त्यांच्या जिल्हा क्रीडांगण, सावगाव रोड येथील अंगडी इन्स्टिट्यूट, लिंगराज कॉलेजचे मैदान, मालिनी सिटी या परिसरात त्यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. परंतु, नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बेळगावमध्ये वास्तव्य करणार आहेत. यामुळे शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांबरा येथील विमानतळापासून हॉटेलपर्यंत व हॉटेलपासून सभास्थळापर्यंत ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

पंधरा समाजाचे प्रमुख करणार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत भाजपचे नेतेमंडळींसोबत सर्वसामान्य कार्यकर्ते करणार आहेत. याबरोबरच बेळगावमधील विविध समाजांचे पंधरा प्रमुख स्वागत करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. सकाळी लवकर सभा असल्याने गोकाक, सौंदत्ती, अरभावी, बैलहोंगल, रामदुर्ग, चिकोडी, हुक्केरी, निपाणी, अथणी या मतदारसंघातून कार्यकर्त्यांना पोहोचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते बेळगाव शहर, बेळगाव दक्षिण व ग्रामीण मतदारसंघातून येणार असल्याची माहिती माजी आमदार संजय पाटील यांनी दिली.

Advertisement
Tags :

.