पंतप्रधान मोदी यांची शिष्टमंडळांशी चर्चा
‘ग्लोबल आऊटरीच’ यशस्वीतेसाठी केले सदस्यांचे कौतुक, शशी थरुर यांची केली विशेष प्रशंसा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आणि त्याचा दहशतवाद यांना उघडे पाडण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ‘ग्लोबर आऊटरीच’ अभियानात सहभागी झालेल्या शिष्टमंडळांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली आहे. मंगळवारी या सर्व शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या कामगिरीची माहिती दिली. भारताच्या 7 शिष्टमंडळांनी जगातील 33 देशांना भेटी दिल्या. या सर्व शिष्टमंडळांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीचे भोजनही केले.
या सर्व शिष्टमंडळांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी भारताचा पक्ष जगाच्या व्यासपीठावर समर्थपणे मांडला आहे. दहशतवाद हा केवळ भारतासमोर नव्हे, तर जगासमोरचा सर्वात मोठा धोका आहे, ही बाब जागतिक नेत्यांच्या मनावर ठसविण्यात ही शिष्टमंडळे यशस्वी झाली आहेत. पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम त्यांनी उत्तमरित्या पार पाडले असून त्यांची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर केली आहे. सर्व शिष्टमंडळांनी त्यांच्यासह सिंदूर अभियान आणि पाकिस्तानचा दहशतवाद यांचे सज्जड पुरावेही नेले होते. त्या पुराव्यांच्या आधारावरच त्यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश या देशांचे मान्यवर नेते आणि वरिष्ट प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर केला.
भारत संमजस आणि संयमित
पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने आपले प्रत्युत्तर ठाम पण संयमित पद्धतीने दिले आहे. भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले नाहीत. केवळ पाकिस्तानच्या दहशतवादी तळांनाच लक्ष केले. पाकिस्तानने भारताच्या सेनातळांवर आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र, भारताने पाकिस्तानचे कैक वायुतळ आणि लष्करी तळ उध्वस्त करुन पाकिस्ताला जबर दणका दिला. ही भारताची भूमिका या शिष्टमंडळांनी सर्व देशांसमोर प्रभावीपणे मांडली. त्यांच्या या अजोड कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद मोदी आनंदित झाले असून त्यांनी त्यांची प्रशंसा केली.
शशी थरुर यांची विशेष कामगिरी
काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. त्यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात तेथील लोकप्रतिनिधीगृहांचे सदस्य, अमेरिकेतील ट्रंप प्रशासनातील महत्वाचे अधिकारी आणि इतर मान्यवर यांची भेट घेऊन, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या धडक कारवाईसंबंधी त्यांना माहिती दिली. भारताला हे ‘सिंदूर’ अभियान का हाती घ्यावे लागले याची कारणमीमांसा त्यांनी केली. तसेच भारताचा दहशतवादाविरोधात संघर्ष करण्याचा ठाम निर्धारही त्यांनी सूचीत केला. भारताच्या अभियानासंदर्भात पाकिस्तानने केलेला अपप्रचारही त्यांनी उघडा पाडला. या त्यांच्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केल्याची सूत्रांची माहिती आहे.
7 मंडळांशी भेट
भारताने विविध देशांना भेटी देण्यासाठी अशा सात शिष्टमंडळांची नियुक्ती केली होती. या शिष्टमंडळांमधील सदस्य हे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार होते. या खासदारांमध्ये सर्व प्रमुख पक्षांच्या खासदारांचा समावेश होता. काही शिष्टमंडळांचे नेतृत्व विरोधी पक्षांच्या खासदारांकडे सोपविण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सातही शिष्टमंडळांची भेट घेतली. प्रत्येक शिष्टमंडळाशी त्यांनी स्वतंत्ररित्या चर्चा केली. त्यांच्याकडून कामगिरीची माहिती घेतली. भारताच्या भूमिकेला अन्य देशांनी कसा प्रतिसाद दिला, त्यांनी कोणते म्हणणे मांडले, भारताच्या शिष्टमंडळांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे कशी दिली, अशी सर्व माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. या भेटीगाठी रात्री उशीरापर्यंत होत होत्या. सदस्यांनी या चर्चेविषयी नंतर पत्रकारांसमोर समाधान व्यक्त केले.
सर्व देशांचा सकारात्मक प्रतिसाद
भारताच्या या अभियानाला शिष्टमंडळांनी भेटी दिलेल्या सर्व देशांनी सकारात्मक आणि उत्कट प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. अनेक देशांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचा निषेध केला. पाकिस्तानने मुस्लीम देशांना केलेले धार्मिक आवाहनही उपयोगी ठरले नाही. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, अर्जेंटिना, ब्रिटन आदी देशांनी भारताच्या दहशतवादविरोधी संघर्षाला पूर्ण पाठिंबा दिला. जपानसारख्या देशांनी तर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सिंदूर अभियानाचेही समर्थन केले, इत्यादी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिष्टमंडळांचे सदस्य आणि त्यांचे प्रमुख यांच्याकडून देण्यात आली.
शिष्टमंडळांचा जगाला संदेश
ड पाकिस्तानच्या क्रूर दहशतवादालाही भारताचे संयमित पण ठाम प्रत्युत्तर
ड दहशतवादाविरोधात सर्व जगाने एकजुटीने संघर्ष करण्याची आवश्यकता
ड पाकिस्तानसंबंधी धोरणात परिवर्तन, कुरापत काढल्यास दणका देणारच
ड दहशतवादाविरोधात भारताचे शून्य सहनशक्तीचे धोरण मांडले जगासमोर