शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान मोदींचा संवाद
‘पीएमओ’ने शेअर केले छायाचित्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. ही माहिती शनिवारी सायंकाळी पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर शुक्ला यांनी अॅक्सिओम स्पेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) प्रवास करून इतिहास रचला होता. त्यांच्यासोबत तीन इतर अंतराळवीर आहेत. राकेश शर्मा यांनी रशियन अंतराळयानातून उ•ाण केल्यानंतर 41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीराचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे.
पंतप्रधान मोदींनी बुधवारी शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अंतराळात यशस्वी उ•ाण केल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये ‘हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे भारत स्वागत करतो.’ असे म्हटले होते. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांनी 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, आशा आणि आकांक्षा आपल्यासोबत नेल्या आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा, असेही पंतप्रधानांनी म्हटले होते.
स्पेसएक्सच्या नवीन ड्रॅगन अंतराळयानातून शुक्ला यांच्यासह इतर अंतराळवीर अवकाशात पोहोचले आहेत. हे अंतराळयान अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकन कमांडर पेगी व्हिट्सन करत आहेत. शुभांशू शुक्ला हे त्याचे मिशन पायलट आहेत. त्यांच्याशिवाय हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोज उझनान्स्की विस्निव्स्की हे मिशन तज्ञ म्हणून गेले आहेत.