पंतप्रधान मोदी उद्या शपथग्रहण करणार
रालोआच्या बैठकीत नेतेपदी निवड, राष्ट्रपतींकडून सरकारस्थापनेचे निमंत्रण, हॅट्ट्रिक साकारणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सलग तिसऱ्यांदा या पदाचे शपथग्रहण करणार, हे आता निश्चित झाले आहे. पाच वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण करून सलग तिसऱ्यांदा देशाचे सर्वोच्च नेते होण्याच्या जवाहरलाल नेहरुंच्या विक्रमाची ते बरोबरी करतील. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राष्ट्रपती भवनात जाऊन सरकार स्थापनेची अनुमती घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले. 9 जूनच्या शपथग्रहण कार्यक्रमाची सज्जता पूर्ण होत आहे. तर नरेंद्र मोदींनी शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहेत.
शुक्रवारी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या आघाडीच्या सर्व पक्षांचे प्रमुख नेते, आघाडीचे सर्व खासदार, आघाडीच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीत एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव ज्येष्ठ नेते राजनाथसिंग यांनी मांडला. त्याला तेलगु देशमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पास्वान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आदी नेत्यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
राष्ट्रपतींची भेट
संध्याकाळी सहा वाजता पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सरकार स्थापनेचे आमंत्रण देण्यासाठी विनंती केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रस्तावाचा स्वीकार करून सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. रविवारी संध्याकाळी 6 वाजता, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी कार्यक्रम होणार आहे. यावेळी अनेक मंत्र्यांनाही शपथ दिली जाणार आहे.
समर्थनाची पत्रे सादर
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचा प्रारंभ होण्यापूर्वी आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या-त्यांच्या पक्षाची समर्थन पत्रे सादर केली. सरकार स्थापन करणाऱ्या नेत्याला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही, याची शाश्वती झाल्यानंतरच सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याचा नियम आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी ही पडताळणी करून सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
घडामोडींनी भरलेला दिवस
शुक्रवारचा दिवस राजधानी दिल्लीत सरकार स्थापनेसंबंधीच्या अनेक घडामोडींनी गजबजलेला ठरला. संसद भवनात सकाळपासूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीची लगबग केली जात होती. आघाडीच्या सर्व खासदारांचीही ये-जा संसदभवनात होती. सकाळी 10 वाजता बैठकीस प्रारंभ झाला. ती साधारणत: दोन तास चालली. सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच त्यांच्या नेतृत्वात देश आर्थिकदृष्ट्या अधिक सुदृढ होईल. जागतिक आर्थिक महसत्ता बनताना देशातील विभागीय आकांक्षांची पूर्तताही होईल. हा समतोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साधला जाईल, असा विश्वास विविध नेत्यांनी, नेतेपदाच्या प्रस्तावाला पाठिंबा देताना व्यक्त केला.
‘ना हारे थे, ना हारे है’
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्या साऱ्यांचा मी आभारी आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी माझी निवड करून आपण सर्वांनी माझ्यावर नवे उत्तरदायित्व सोपविले आहे, ते माझ्या पूर्ण शक्तीनिशी निभावण्याचा प्रयत्न मी करणार आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रपक्षांचे आभार मानले. काँग्रेस आणि विरोधकांवरही त्यांनी खोचक टोले हाणले. 4 जूनला जेव्हा मतगणना होत होती. तेव्हा मी काही महत्त्वाच्या कामात होतो. आघाडी जिंकत आहे, असे मला दूरध्वनीवरुन समजले. आता विरोधक मतदानयंत्रांची प्रेतयात्रा काढणार, असा विचार माझ्या मनात आला. लोकशाहीवरचा लोकांचा विश्वासच उडाला पाहिजे, अशी विरोधकांनी इच्छा असल्याने ते सर्वच यंत्रणांवर अविश्वास व्यक्त करतात. पण आता मतदानयंत्रांनीच त्यांची तोंडे बंद केली आहेत, असे टोले त्यांनी लगावले. काँग्रेसचे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये जितके खासदार निवडून आले त्यापेक्षा अधिक आमचे या एका निवडणुकीत आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमचे सरकार कोणताही भेदभाव न करता, सर्व गरीब, महिला, शेतकरी, पिडित आणि शोषितांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना नाकारले
विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात खोटी कथानके पसरविण्याचा प्रयत्न केला. यथेच्छ अपप्रचार केला. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे दुर्लक्ष करून देशाला पुढे नेले. देशाचा विकास केला. जगात देशाची मान उंच केली. त्यांच्या या कार्यामुळेच जनतेने त्यांना विजयी करून सलग तिसरी संधी दिली आहे. विरोधकांना जनतेने नाकारले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक कविताही सादर केली...
मै उस माटीका वृक्ष नही, जिसको नदियोंने सिंचा है
बंजर माटीमे पलकर मैने मृत्यू से जीवन खींचा है
मै पत्थर पे लिखी इबारत हूं, शीशे से कबतक तोडोगे
मिटनेवाला मै नाम नही, तुम मुझको कबतक रोकोगे
योग्यवेळी योग्य नेता
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविश्रांत काम करणारे नेते आहेत. त्यांनी आंध्र प्रदेशात ज्या प्रचारसभा केल्या, त्यांचा मोठा लाभ तेलगु देशमलाही झाला. तेलगु देशमने राज्यात लोकसभेच्या 25 पैकी 16 जागा जिंकल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 21 जागांवर विजय मिळाला. आजच्या स्थितीत जसा नेता देशाला आवश्यक आहे, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ‘योग्य वेळी योग्य नेता’ असे त्यांचे वर्णन करता येईल. देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनविण्यात त्यांनी मोठे काम केले आहे. संपूर्ण देशाची आर्थिक प्रगती साध्य करत असतानाच विभागीय आकांक्षांची पूर्तता करण्याचा समतोल आमच्या सरकारला राखावा लागणार आहे, अशी भलावण तेलगु देशमचे चंद्राबाबू नायडू यांनी केली.
बिहारकडेही लक्ष दिले जाईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास झपाट्याने करतील. आम्ही त्यांना या कार्यात पूर्ण सहकार्य करणार आहोत. प्रत्येक दिवशी आम्ही त्यांच्या संपर्कात राहू आणि त्यांना साहाय्य करू. बिहारची प्रलंबित कामेही आता पूर्ण होतील. आम्ही सर्व एकत्र आलो आहोत, ही बाब लक्षणीय आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व काम करणार आहोत, अशी प्रशंसा संजदचे नेते नितीश कुमार यांनी केली. या निवडणुकीत ‘काही लोक’ काहीबाही बोलून काही जागा जिंकले आहेत. त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. देशाची कोणतीही सेवा केलेली नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा ते पराभूत होतील, असा टोला नितीश कुमार यांनी बिहारमधील आपल्या विरोधकांना त्यांचा नामोल्लेख टाळून हाणला.
नवे राज्य, नवी आव्हाने
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या परिस्थितीत नव्याने उत्तरदायित्वास सज्ज
ड नायडू, कुमार यांना आपल्याकडे वळविण्यात विरोधक पूर्ण अपयशी
ड राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीची सज्जता पूर्ण
ड शपथविधी कार्यक्रमासाठी बांगला देश, नेपाळ मालदीवचे नेते येणार