For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांचा योगदिन श्रीनगरात

07:10 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांचा योगदिन श्रीनगरात
Advertisement

दल सरोवर परिसरात करणार योगसाधना, आज जगभरात योगदिनाची धामधूम

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून यावर्षीचा योगदिन आज शुक्रवारी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे साजरा केला जाणार आहे. त्यांचे श्रीनगर येथे गुरुवारीच आगमन झाले आहे. ते आज सकाळी येथील जगप्रसिद्ध ‘दल सरोवर’ परिसरात योगसाधना करणार आहे. त्यांच्यासह इतर अनेक मान्यवर असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच 2014 मध्ये जगात 21 जून हा दिवस योगदिन म्हणून साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली आहे. यंदाचा हा 11 वा योगदिन आहे. मध्यंतरीच्या कोरोना काळातही योगदिन साजरा करण्यात आला होता. आज शुक्रवारी साऱ्या जगात योगदिनाची धामधूम पहावयास मिळणार असून ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कोट्यावधी योगप्रेमी योगासने आणि इतर योगव्यायामांची प्राक्षक्षिके करणार आहेत. अनेक शहरांमध्ये या कार्यक्रमांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम योगदिनापासून गेली दहा वर्षे सातत्याने योगप्रेमींच्या संख्येत वाढ होत आहे, असे दिसून येत आहे.

Advertisement

श्रीनगरमध्ये कडेकोट सुरक्षा

जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये गेले पाच दिवस सातत्याने दहशतवादी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर हे स्थान योगदिन साजरा करण्यासाठी निर्धारित केले आहे. त्यामुळे श्रीनगर येथे सुरक्ष व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विशेषत: दाल सरोवर परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक सर्वत्र नियुक्त आहेत.

अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी या केंद्रशासित प्रदेशात अनेक लोकोपयोगी प्रकल्पांची उद्घाटने केली. या प्रकल्पांमध्ये मार्ग, जलपुरवठा आणि शिक्षण विषयक अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या निर्मितीला 1 हजार 500 कोटींहून अधिक रुपयांचा खर्च आलेला आहे. काही नव्या प्रकल्पांचा शिलान्यासही ते करणार आहेत. 1 हजार 800 कोटी रुपये खर्चाच्या जेकेसीआयपी, चेनानी-पटनीटॉप-नाशरी खंड, औद्योगिक वसाहत, सरकारी पदवी महाविद्यालये आदी प्रकल्पांचे उद्घाटनही ते करणार आहेत. जलपुरवठा प्रकल्पाचा लाभ या प्रदेशातील 20 जिल्ह्यांच्या 90 प्रभागांमधील 15 लाख लोकांना होणार आहे. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 हजार कर्मचाऱ्यांना सेवापत्रेही वितरीत करणार आहेत.

योगदिनाला वाढता प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय योगदिनाला यावेळी मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. हा दिन जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये साजरा केला जातो. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, कॅनडा पासून पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, कुवैत आदी देशांमध्येही तो साजरा केला जातो.

Advertisement
Tags :

.