सेशल्समध्ये पंतप्रधान मोदी यांचे स्वागत
ऐतिहासिक ‘बॉटनिकल गार्डन’मध्ये भेट कार्यक्रम
► वृत्तसंस्था/ व्हिक्टोरिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेशल्स या देशाची राजधानी व्हिक्टोरिया येथे भव्य स्वागत करण्यात आले आहे. या देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. त्यांच्यासह या देशाचे अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारीही स्वागत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांची काहीकाळ विमानतळावरच चर्चा झाल्याचे वृत्त देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध अधिकच दृढ होतील. दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांना साहाय्यभूत ठरु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या 12 वर्षांच्या कालखंडात दोन्ही देश एकमेकांच्या अधिक नजीक आले आहेत. संरक्षण, तंत्रज्ञान आदानप्रदान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत होणार आहे, अशी भलावण हर्मिनी यांनी केली. या स्वागतानंतर या दौऱ्याला औपचारीक प्रारंभ करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मानले आभार
सेशल्समध्ये आपले भव्य स्वागत केल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचे अध्यक्ष हर्मिनी आणि प्रशासन यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी तसा संदेशही ‘एक्स’वर प्रसारित केला. सेशल्स हा भारताचा ऐतिहासिक सागरी भागीदार आहे. हिंदी महासागरातील तो भारताचा एक निकटचा मित्र देश आहे. दोन्ही देशांच्या सहकार्याने दोन्ही देशांला लाभ होईल. सध्याच्या आव्हानात्मक काळात दोन्ही देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सेशल्स हे हिंदी महासागरातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र आहे.
राष्ट्रीय बॉटनिकल गार्डनला भेट
या देशाच्या दौऱ्याला प्रारंभ केल्यानंतर त्वरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाच्या राष्ट्रीय बॉटनिकल गार्डनला भेट दिली. तेथे त्यांनी ‘कोका डी मार’ रोपट्याचे रोपण केले. ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत हे रोपटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावले आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली आहे. भारत आणि सेशल्स यांच्यातील राजनैतिक संबंधांचे हे 50 वे वर्ष आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आयोजित झाला आहे.
आज महत्वाचे कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा 29 जून पर्यंत आहे. रविवारी या देशाचा राष्ट्रीय दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा होणार असून हिंदी महासागरातील सुरक्षेसंबंधातील मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे. हिंदी महासागरात आता चीन मोठ्या प्रमाणात हालचाली करत असून ते भारतासमोर मोठे आव्हान आहे.