For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी फेब्रुवारीत अमेरिकेत

06:23 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी फेब्रुवारीत अमेरिकेत
Advertisement

डोनाल्ड ट्रंप यांनी दिली माहिती, द्विपक्षीय सहकार्य दृढ करणार, स्थलांतरितांच्या मुद्द्यावरही चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा करतील आणि व्हाईट हाऊस येथे आपल्याला भेटतील, अशी शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत असणाऱ्या भारताच्या बेकायदेशीर स्थलांतरितासंबंधीही भारत योग्य तेच करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यासंबंधात भारताकडून दुजोरा मिळालेला नसला, तरी हा दौरा जवळजवळ निश्चित मानला जात आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनी संभाषण केले होते. या संभाषणाविषयीची माहिती त्यांनी नंतर ‘एक्स’वर प्रसारित केली होती. सोमवारी रात्री उशीरा व्हाईट हाऊसकडूनही या चर्चेचा गोषवारा स्वतंत्ररित्या स्पष्ट करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांची चर्चा सकारात्मक आणि फलदायी झाली असून दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच दोन्ही देशांमधील व्यापारही समतोल आणि उचित पद्धतीने विकसीत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताशी जिव्हाळ्याचे संबंध

आमचे भारताशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भारत आमच्यासाठी महत्वाचा देश आहे. सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिका सोडायला लावण्याचे आमचे धोरण आहे. अन्य अनेक विषयांसह या संदर्भातही आमची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरुन प्रदीर्घ चर्चा झाली आहे. स्थलांतरितांच्या संदर्भात भारत योग्य तो निर्णय घेणार आहे. दोन्ही देश या संदर्भात चर्चा करीत आहेत. आम्ही त्यांच्या अमेरिका दौऱ्याविषयीही चर्चा केली. ते व्हाईट हाऊसमध्ये फेब्रुवारीत येत आहेत, अशी माहिती ट्रंप यांनी दिली. ते फ्लोरिडाहून विमानाने वॉशिंग्टनला परतत असताना विमानात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.

सर्व विषयांवर चर्चा

भारत आणि अमेरिका यांच्या संदर्भातील सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली आहे. आंतरराष्ट्रीय विषयही चर्चेत आले होते. विभागीय सुरक्षा, मध्यपूर्वेतील परिस्थिती, भारत-प्रशांतीय क्षेत्रातील सहकार्य आणि युरोपातील परिस्थिती आदी विषयांवर बोलणी झाली. मुख्य मुद्दे द्विपक्षीय संबंधाविषयी होते. भारताशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. आमची चर्चा समाधानकारक झाली. अनेक विषयांवर दोन्ही देश चर्चा करीत आहेत. या चर्चा प्रगतीपथावर आहेत, असेही प्रतिपादन डोनाल्ड ट्रंप यांनी केले, अशी माहिती देण्यात आली.

शत्रखरेदी वाढविण्याचे आवाहन

भारताने अमेरिकेकडून संरक्षण साधने आणि शस्त्रे यांची खरेदी अधिक प्रमाणात करावी. तसेच व्यापारासंदर्भात उचित धोरण लागू करावे, असे आवाहनही यावेळी ट्रंप यांनी केले. भारत हा आमेरिकेचा सामरिक आणि धोरणात्मक भागीदार देश आहे. ही भागीदारी अधिक दृढ व्हावी अशी आमची इच्छा आहे. भारतात यावेळी एप्रिलमध्ये प्रथमच अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या ‘क्वाड’ संघटनेची बैठक होत आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येत आहोत, असेही अध्यक्ष ट्रंप यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

व्यापार करासंबंधी उत्सुकता

ब्राझील, चीन, भारत आणि इतर अनेक देश अमेरिकेच्या वस्तूंवर मोठा आयात कर लावतात. त्यामुळे अमेरिकेची हानी होते. आम्हीही या देशांच्या वस्तूंवर अधिक कर लावण्याचे धोरण स्वीकारले आहे. परस्पर व्यापार समतोल पद्धतीने होणे आवश्यक आहे, हे आमचे सूत्र आहे, असेही प्रतिपादन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले. त्यामुळे व्यापाराचा मुद्दा कसा हाताळला जातो, यासंबंधी उत्सुकता आहे.

ड भारत आणि अमेरिका संबंध दृढ करण्यावर डोनाल्ड ट्रंप यांचा भर

ड व्यापारी कर हा कळीचा मुद्दा, समतोल, वाजवी धोरणांसंबंधी बोलणी

ड प्रादेशिक सुरक्षितता हा दोन्ही देशांसाठी सामायिक महत्वाचा विषय

ड भारताशी सामरिक आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याचा निर्णय

Advertisement
Tags :

.