For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज पंतप्रधान घेणार मंत्र्यांची 'हजेरी'; नरेंद्र मोदी घेणार निवडक मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसोबत आढावा बैठक; मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा

09:03 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आज पंतप्रधान घेणार मंत्र्यांची  हजेरी   नरेंद्र मोदी घेणार निवडक मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसोबत आढावा बैठक  मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा
Advertisement

नवी दिल्ली: केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीसंदर्भात सोमवारी संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान मोदी भूषवणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीत विशिष्ट मंत्रालयांच्या कामकाजाशी आणि मंत्र्यांच्या कामगिरीशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच नजीकच्या काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाशीही या बैठकीचा संबंध जोडला जात आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विशेषतः सामाजिक न्याय आणि लोककल्याणावर लक्ष केंद्रित केले जाईल. या बैठकीला केवळ सामाजिक कल्याणाशी संबंधित खाती असलेले राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, येत्या काही दिवसांत इतर मंत्रालयांच्या मंत्र्यांसोबतही अशाच प्रकारच्या बैठका होणार आहेत.

या चर्चेत प्रामुख्याने शिक्षण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि कृषी मंत्रालयावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये नियोजित योजनांची अंमलबजावणी किती वेगाने झाली आहे आणि मंत्र्यांनी आपली जबाबदारी कशी पार पाडली आहे? याचे मूल्यांकन केले जाणार आहे. आपल्या विभागातील उत्तरदायित्व हादेखील या बैठकीचा एक महत्त्वाचा घटक असेल. म्हणजेच मंत्र्यांच्या आपापल्या जबाबदाऱ्यांमधील कामगिरीवर चर्चा केली जाईल. तथापि, बैठकीनंतर कोणत्याही मंत्र्यांबाबत तात्काळ निर्णय घेतले जातील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

Advertisement

केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकांमध्ये मंत्र्यांच्या कामगिरीवर चर्चा होणार असल्याने, त्यांचा संबंध संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाशी जोडला जात आहे. तथापि,
फेरबदलाबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार येत्या काही दिवसांत राज्यमंत्र्यांच्या दुसऱ्या गटासोबतही अशाच प्रकारच्या बैठका घेऊ शकते. विविध मंत्रालयांचे कामकाज समजून घेणे हा याचा उद्देश आहे. सर्व विभागांची माहिती जाणून घेतल्यानंतर मंत्रिमंडळ खांदेपालटावर वरिष्ठ पातळीवर विचार केला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकांवरून सरकार विविध मंत्रालयांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.

Advertisement
Tags :

.