पंतप्रधान मोदींचे थायलंडमध्ये थाटात स्वागत
भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद : पंतप्रधान शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय बैठक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, बँकॉक
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपात प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय बैठकही केली. यावेळी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी संबंधांवर चर्चा केली. थायलंडची राजधानी बँकॉक येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विमानतळावर भारतीय समुदायाच्या लोकांना भेटले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. भारत आणि थायलंडमधील शतकानुशतके जुने संबंध आपल्या खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधांशी जोडलेले आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराने आपल्या लोकांना एकत्र आणले आहे. रामायणातील कथा थाई लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
सामंजस्य करारांची देवाणघेवाण
बँकॉकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांच्या उपस्थितीत भारत आणि थायलंडमध्ये महत्त्वाचे सामंजस्य करारही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉकमध्ये थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. बँकॉकला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी भारतीय संस्कृतीचे थेट प्रदर्शन पाहिले. त्यांनी स्थानिक थाई समुदायाचे गुजराती नृत्य गरबा आणि गायन देखील पाहिले. शीख समुदायाने पंतप्रधान मोदींना अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची प्रतिमा भेटीदाखल प्रदान केली. पंतप्रधानांच्या आगमनानंतर जैन समुदायाने नवजार मंत्र सादर केले. इस्कॉन समुदायाने पंतप्रधानांना गीता भेट दिली आणि कालातीत रामायणाशी संबंधित सांस्कृतिक नृत्य सादरीकरण देखील पाहिले. याचदरम्यान त्यांनी थाई रामायणावर आधारित कथानाट्याही पाहिले. येथे रामायणाला रामकीन म्हटले जाते.
थायलंडच्या राजाला भेटणार
पंतप्रधान मोदी शुक्रवारी थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न आणि राणी सुथिदा यांचीही भेट घेतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी थायलंडच्या ऐतिहासिक वाट फो मंदिरालाही भेट देऊ शकतात. वाट फो मंदिर बँकॉकमध्ये असून ते बुद्ध मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. वाट फो हे थायलंडमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. येथे 1,000 हून अधिक बुद्ध मूर्ती आणि 90 हून अधिक स्तूप आहेत.
आज बिम्सटेक परिषद
पंतप्रधान मोदी शुक्रवारी बिम्सटेक परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत ते भारताच्या हिताच्या बाबी मांडण्यासोबतच इतर देशांशी सहकार्य वाढवण्याशी संबंधित विविध मुद्यांना स्पर्श करतील. या परिषदेनंतर ते बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस खान यांनाही भेटू शकतात. युनूस खान यांचे मुख्य सल्लागार खलीलुर रहमान यांनी बुधवारी द्वयींच्या भेटीची शक्यता व्यक्त केली. गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची ही पहिलीच बैठक असेल.