For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खामेनींच्या अंत्यविधीला पंतप्रधान मोदींना निमंत्रण

06:02 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
खामेनींच्या अंत्यविधीला पंतप्रधान मोदींना निमंत्रण
Advertisement

इराणच्या राष्ट्राध्यक्षांकडून आमंत्रित : जुलै महिन्याच्या प्रारंभी दफनविधी 

Advertisement

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली, तेहरान

Advertisement

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते, अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्कार आणि दफनविधीला उपस्थित राहण्यासाठी औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान इराणमधील विविध शहरांमध्ये होणाऱ्या या अंत्यविधी कार्यक्रमासाठी अनेक देशांतील लाखो लोक आणि मान्यवर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमांची सुरुवात राजधानी तेहरानमध्ये होईल आणि मशहदमध्ये समारोप होईल, असे इराण सरकारने म्हटले आहे. खामेनी यांना दफन केले जाईल. मशहद हे त्यांचे जन्मस्थान आणि शिया मुस्लिमांचे एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे.

तेहरानवर 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खामेनी यांचे पार्थिव 4 आणि 5 जुलै रोजी तेहरानमधील ग्रँड मोसल्ला संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर 6 जुलै रोजी शासकीय अंत्ययात्रा काढण्यात येईल. या सोहळ्यादरम्यान तेहरान प्रांतात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 4 आणि 5 जुलै रोजी तेहरानमध्ये श्रद्धांजली आणि अंत्यविधी प्रार्थना आयोजित केल्या जातील, तर अंत्यविधी 6 जुलै रोजी होईल, असे या कार्यक्रमावर देखरेख करणारे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर हसन हसनझादेह यांनी सांगितले.

तेहरान व्यतिरिक्त कोम आणि मशहदसारख्या प्रमुख धार्मिक शहरांमध्येही स्मृती कार्यक्रम आयोजित केले जातील. 7 जुलै रोजी कोममध्ये एक विशेष समारंभ आयोजित केला जाईल, तर 9 जुलै रोजी मशहद येथील इमाम रझा दर्गा संकुलात खामेनी यांना दफन केले जाईल. यानिमित्ताने दोन्ही शहरांमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल. 8 जुलै रोजी शेजारील इराकमध्येही विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातील. नजफ आणि कर्बला यांसारख्या प्रमुख शिया धार्मिक शहरांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातील. याठिकाणी जमलेल्या गर्दीतून या प्रदेशातील खामेनी यांचा प्रभाव दिसून येईल.

खामेनी यांच्या निधनानंतर भारतानेही शोक व्यक्त केला आहे. भारत सरकारच्यावतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देत शोकपुस्तिकेत देशाच्या श्रद्धांजलीची नोंद केली. सुरुवातीला खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार मार्चमध्ये होणार होते, परंतु मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.

Advertisement

.