पंतप्रधान मोदी यांना जी-7 चे निमंत्रण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडात होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. कॅनडाचे नेते मार्क कर्नी यांनी त्यांना दूरध्वनी करुन हे निमंत्रण दिले. ही शिखर परिषद याच महिन्यात होत असून आपण या परिषदेला उपस्थित रहाणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
स्वत: त्यांनीच ‘एक्स’ वर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. कॅनडाचे नवनियुक्त नेते मार्क कर्नी यांनी आपल्याला शुक्रवारी दूरध्वनी केला. त्यांनी कॅनडाच्या सांसदीय निवडणुकीत मिळविलेल्या विजयासाठी मी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी मला जी-7 परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आपण या परिषदेला उपस्थित राहणार आहोत, हे त्यांनी संदेशात स्पष्ट केले आहे.
राजकीय रंग
कॅनडातील जी-7 परिषदेला भारतात राजकीय रंग प्राप्त झाला होता. भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले आहे. कॅनडाने भारताला या परिषदेचे औपचारिक आमंत्रण देखील दिलेले नाही. यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय पत किती ढासळली आहे, याची प्रचीती येते, अशी टीका विरोधी पक्षांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे तणाव निर्माण झाल्याने कॅनडात होणाऱ्या या परिषदेचे निमंत्रण भारताला मिळणार नाही, असा विरोधी पक्षांचा कयास होता. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीका केली होती. तथापि, आता हे निमंत्रण मिळाले आहे. यावर विरोधी पक्षांनी त्यांची प्रतिक्रिया अद्याप व्यक्त केलेली नाही. ही परिषद कॅनडातील अल्बर्टा येथे 15 जून ते 17 जून या कालावधीत होत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.