पंतप्रधान मोदी-दुबई राजपुत्र यांची चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दुबईचे राजपुत्र शेख हमदान बिन मोहम्मद अल् मक्तुम हे भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी भारत तसेच दुबई आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केल्याची माहिती नंतर देण्यात आली आहे.
मक्तुम हे संयुक्त अरब अमिरातीचे उपनेते तसेच संरक्षणमंत्रीही आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीचा वृत्तांत सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सर्वंकष धोरणात्मक भागिदारी स्थापन करण्यात दुबईने मोठी भूमिका साकारली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात प्रगाढ मैत्री असून ती उत्तरोत्तर अधिक दृढ होत जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट पेले आहे.
संरक्षणमंत्र्यांशीही भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी मक्तुम यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि इतर मुद्द्यांवर विचारविमर्श केला. ही चर्चा यशस्वी आणि उत्पादक ठरल्याचे प्रतिपादन राजनाथसिंग यांनी केले. संयुक्त अरब अमिरातीशी असलेली भारताची धोरणात्मक भागीदारी दोघांसाठीही लाभदायक ठरली असून उत्तरोत्तर ती अधिक बळकट होत जाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शानदार स्वागत
मक्तुम यांचे भारतात मंगळवारी सकाळी आगमन झाले. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी भारत सरकारच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांना पाठविण्यात आले होते. दुबईचे राजपुत्र या नात्याने मक्तुम यांचा हा प्रथम भारत दौरा आहे.