पंतप्रधान मोदी यांनी केले ‘स्नॉर्कलिंग’
लक्षद्वीपमधून पाठविली प्रवाळांची सुंदर छायाचित्रे
वृत्तसंस्था /लक्षद्वीप
भारताच्या दक्षिणेकडे अरबी समुद्रात असणाऱ्या लक्षद्वीप बेटांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्नॉर्कलिंग’चाही आनंद घेतला आहे. ‘स्नॉर्कलिंग’ याचा अर्थ समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली जाऊन समुद्रातील सजीव सृष्टीचे दर्शन घेणे असा आहे. हा एक आनंददायक पण तितकाच अवघड खेळ मानला जातो. लक्षद्वीप बेटांवर पर्यटक या खेळाचा आनंद घेण्यासाठी सहस्रावधींच्या संख्येने येत असतात. ‘स्नॉर्कलिंग’चा समावेश धाडसी खेळांमध्ये (अॅडव्हेंचर स्पोर्ट) होतो. सर्वसाधारणपणे वयाची साठी ओलांडल्यानंतर तो खेळू नये असे म्हटले जाते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी हे धाडस दाखवून सर्वांची प्रशंसा मिळविली आहे. त्यांनी समुद्राच्या आतल्या भागातील नयनमनोहर प्रवाळ आणि रंगीबेरंगी मासे यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत.
मास्कचा उपयोग
‘स्नॉर्कलिंग’ करताना मास्क आणि ऑक्सिजन सिलिंडरचा उपयोग करावा लागतो. वेशभूषाही या खेळाला योग्य अशी करावी लागते. या सर्वांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ समुद्राच्या पृष्ठभागाखाली व्यतीत केला. हा अत्यंत आनंददायक तितकाच थरारक अनुभव होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी नंतर व्यक्त केली.
2019 मध्ये प्रथम...
2019 मध्ये प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या धाडसी अंगाची माहिती लोकांना झाली. त्यावेळी त्यांनी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट अभयारण्यात वन्य प्राण्यांच्या सहवासात काही काळ घालविला होता. त्याची दृष्ये ‘डिस्कव्हरी’ या वाहिनीवरही प्रसारित करण्यात आली होती. मोकळ्या रानात फिरणाऱ्या आणि शिकार करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या सहवासातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘शांत आणि उत्साही’ पद्धतीने तो अनुभव घेतला होता, अशी प्रशंसा त्यांच्या समवेत असणाऱ्या मार्गदर्शकांनी त्यावेळी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत नम्र आणि सहकार्य भावना असणारे व्यक्ती आहेत, अशी भावना त्यांच्या मार्गदर्शकांनी आणि साहाय्यकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता 2023 मध्ये त्यांनी ‘स्नॉर्कलिंग’चा आनंद घेऊन या वयातही आपण साहसी खेळांमध्ये भाग घेऊ शकतो, हे दर्शवून दिले आहे. त्यांनी व्हायरल केलेल्या छायाचित्रांचा आनंद अनेकांनी घेतला आहे.