For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

PM Modi Honoured पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, गार्ड ऑफ ऑनर’ही प्रदान

08:41 PM Jun 28, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pm modi honoured पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान  गार्ड ऑफ ऑनर’ही प्रदान
Victoria [Seychelles], Jun 28 (ANI): Prime Minister Narendra Modi attends the National Assembly of Seychelles, in Victoria on Sunday. (@MEAIndia X/ANI Photo)
Advertisement

► वृत्तसंस्था
व्हिक्टोरिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ प्रदान करण्यात आला. यासह, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 34 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी सेशेल्सचे लोक, सरकार आणि राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांनी हिंद महासागराला ‘संधींचा महासागर’ बनवण्यासाठी भारत आणि सेशेल्सने एकत्र काम केले पाहिजे, असे सुतोवाचही केले.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरणाचे संरक्षण, हवामान बदलाचा सामना आणि दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. मोदींना आतापर्यंत तीन प्रमुख पर्यावरणीय पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी, मे 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांची एक संस्था असलेल्या अन्न आणि कृषी संघटनेने त्यांना अॅग्रिकोला पदकाने सन्मानित केले होते. 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान, ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ प्रदान केला.

हिंदी महासागरात वसलेल्या सेशेल्समध्ये मोदी शनिवारी तीन दिवसांच्या द्रौयासाठी दाखल झाले. रविवारी राजधानी व्हिक्टोरिया येथील स्टेट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये बैठक झाली. यात परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
19 करारांवर स्वाक्षरी
भारत आणि सेशेल्स यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याला नव्या उंचीवर नेले आहे. नरेंद्र मोदी आणि पॅट्रिक हर्मिनी यांच्यातील उच्चस्तरीय बैठकीदरम्यान एकोणीस महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. भारताने हिंद महासागरातील या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या द्वीप राष्ट्रासोबत सुरक्षा, डिजिटल, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपले संबंध अधिक दृढ केले आहेत. याप्रसंगी प्रत्यार्पण करार, आरोग्यसेवा आणि अंतराळ व कृषी क्षेत्राशी संबंधित करारांवर स्वाक्षरीही करण्यात आली.

Advertisement

मोदी-हर्मिनी भेटीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली. करारांच्या पूर्ततेनंतर मोदींनी भारत आणि सेशेल्स दोन्ही देशांच्या उद्योगांसाठी नवीन संधी शोधत राहतील आणि दोन्ही देशांमधील संपर्क आणि कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत केली जाईल, असे सांगितले. भारत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील आपला यशस्वी अनुभव सेशेल्ससोबत सामायिक करेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे
पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. भारतीय सशस्त्र दलाची तुकडी, भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस तारकश आणि जलसर्वेक्षण जहाज आयएनएस इक्षक हे देखील संचलन आणि सोहळ्याचा भाग होते. यापूर्वी, सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया येथे पंतप्रधान मोदींना औपचारिक ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आली. हा एक लष्करी सन्मान असून त्यामध्ये सैनिक जागेवर उभे राहून राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा विशेष पाहुण्यांना सलामी देतात.
175 दशलक्ष डॉलर्सचे आर्थिक पॅकेज
भारताने सेशेल्सचा विकास आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 175 दशलक्ष डॉलर्सच्या (1651 कोटी रुपये) आर्थिक पॅकेजची घोषणा केली. याव्यतिरिक्त भारताने सेशेल्सला भारतीय बनावटीचे वेगवान गस्ती जहाज ‘पीएस लेस्पावर’ भेट दिले. यामुळे सेशेल्सच्या सागरी निगराणी क्षमता मजबूत होतील.

हिंदी महासागराला संधींचा महासागर बनवा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यात रविवारी एक मोठे विधान केले. ते म्हणाले की, भारताला हिंदी महासागराला ‘संधींचा महासागर’ बनवायचे आहे. या प्रदेशात सागरी सुरक्षा आणि आर्थिक प्रगती दोन्ही आवश्यक आहेत. भारताची भागीदारी देशाच्या आकारावर आधारित नसून, परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित आहे. आमचा विश्वास आहे की हिंदी महासागर हे आपले सामायिक घर आहे. त्याची सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धी ही आपली सामायिक जबाबदारी आहे. हा भारताच्या ‘ओशन’ व्हिजनचा गाभा असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.