पंतप्रधानांची ‘विक्रांत’वर नौसैनिकांसोबत दिवाळी
सैनिकांना मिठाई वाटप : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सैन्याने पाकिस्तानची झोप उडवल्याचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कारवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘आयएनएस विक्रांत’वर भारतीय नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत पंतप्रधानांनी कारवारच्या किनाऱ्यावर तैनात लढाऊ जहाजाला भेट दिली. नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान रविवारी रात्रीच लढाऊ जहाजावर दाखल झाले होते. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधितही केले. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदींनी सातत्याने सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसैनिकांना संबोधित करताना 40 मिनिटांचे भाषण केले. आयएनएस विक्रांत हे स्वावलंबी भारत आणि मेड इन इंडियाचे एक मोठे प्रतीक असल्याचे स्पष्ट करताना ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी या जहाजाने पाकिस्तानची झोप उडवली होती असा पुनरुच्चार मोदींनी केला. भारतीय नौदलाने निर्माण केलेली भीती, भारतीय हवाई दलाने दाखवलेले अद्भुत कौशल्य आणि भारतीय लष्कराचे शौर्य अशा तिन्ही दलांमधील यशस्वी समन्वयातून ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला इतक्या लवकर शरणागती पत्करावी लागली, असे ते पुढे म्हणाले. ‘आयएनएस विक्रांत’वरील दौऱ्यात पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधण्यासोबतच गाणी गायली, मिठाई वाटली आणि रात्रीचे जेवणही केले. पंतप्रधानांनी सैनिकांना भेट देऊन दिवाळी साजरी करण्याची ही 12 वी वेळ आहे. गेल्यावर्षी पंतप्रधानांनी गुजरातमधील कच्छला भेट देत बीएसएफ, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांना मिठाई वाटली होती. गेल्या 11 वर्षांत पंतप्रधानांनी दिवाळी सणानिमित्त सर्वाधिक चारवेळा जम्मू काश्मीरला भेट दिली आहे.
नक्षल-माओवादापासून 100 जिल्हे मुक्त
2014 पूर्वी देशभरातील अंदाजे 125 जिल्हे नक्षल आणि माओवादी हिंसाचाराने प्रभावित झाले होते. गेल्या 10 वर्षांच्या कठोर परिश्रमामुळे ही संख्या सातत्याने कमी होत गेली असून आज ती फक्त 11 पर्यंत कमी झाली आहे. सध्या 11 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचे अस्तित्व असले तरी फक्त 3 जिल्हे प्रभावशाली आहेत. तरीही आता नक्षल-माओवाद्यांच्या दहशतीपासून मुक्त झालेले 100 हून अधिक जिल्हे सुटकेचा नि:श्वास टाकत भव्य दिवाळी साजरी करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ज्या भागात नक्षलवादी रस्ते अडवत असत, शाळा रोखत असत, शाळांवर बॉम्बस्फोट करत असत आणि डॉक्टरांना गोळ्या घालत असत, तिथे आता नवीन उद्योग स्थापन होत आहेत. महामार्ग आणि शाळा बांधल्या जात आहेत. हे सर्व सुरक्षा दलांच्या त्याग आणि समर्पणामुळे शक्य झाले असल्याचेही ते पुढे म्हणाले.
सर्व सुरक्षा दलांचा अभिमान
आमच्या नौदलाने परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. तुमच्या शौर्य आणि धाडसाने जगभरातील भारतीयांचा आत्मविश्वास बळकट केला आहे. आमच्या सशस्त्र दलांनी जमीन, समुद्र आणि हवेत प्रत्येक परिस्थितीत अत्यंत संवेदनशीलतेने सेवा दिली असल्याचे मोदी पुढे म्हणाले. आज मी भारतीय तटरक्षक दलाचेही कौतुक करतो. ते नौदलाशी समन्वय साधून रात्रंदिवस तैनात राहतात. आपल्या सशस्त्र दलांच्या धाडसामुळे देशाने एक मोठा टप्पा गाठल्याचेही त्यांनी नमूद केले.
मी सैनिकांकडून खूप काही शिकलो : मोदी
मी कालपासून सैनिकांसोबत आहे. मी तुमच्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो आहे, मी काहीतरी शिकणार आहे. जेव्हा मी दिल्ली सोडले तेव्हा मला वाटले की मी या क्षणाचा आनंद घ्यावा. तुमची तपस्या, तुमची भक्ती, तुमचे समर्पण उच्च असल्याचा अनुभव मी घेत आहे. सैनिकांचे जगणे किती कठीण असेल याची मी कल्पना करू शकतो असे सांगत वेगवेगळ्या परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या नौसैनिकांची पंतप्रधानांनी पाठ थोपटली.
नौदल अधिकाऱ्यांसोबत ‘बडा खाना’
बडा खाना हा सशस्त्र दलांच्या गौरवशाली परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हे केवळ सामुदायिक जेवण नाही तर आध्यात्मिक तृप्तीचा क्षण असतो. ते सैनिकांमधील सौहार्द, एकता आणि परस्पर आदराची भावना मजबूत करते. या प्रसंगी, सर्व श्रेणीतील अधिकारी आणि सैनिक एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत असल्यामुळे ‘आपण सर्व एक आहोत’ ही भावना आणखी बळकट होते. याच भावनेतून पंतप्रधानांनी रविवारी रात्री नौदल अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत ‘बडा खाना’मध्ये उपस्थिती दर्शवली.