‘नक्षल’गड हादरवण्याचा कट उधळला
बिजापूरमध्ये 25 किलो स्फोटके निकामी : डीआरजी-सीआरपीएफ जवानांची संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगडमधील बिजापूरच्या उस्सूर भागात डीआरजी आणि सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावला. मायनिंग डिमिनिस्ट्रेशन ऑपरेशन दरम्यान सैन्याने 25 किलो आयईडी स्फोटके जप्त केली. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या स्फोटक कटाची वेळीच कल्पना आल्याने तो उधळून लावला. अन्यथा, या भागात मोठा घातपात घडला असता.
सुरक्षा दलाची एक तुकडी रविवारी मायनिंग काढण्याच्या कामासाठी बाहेर पडली असता आयईडी आढळून आली. उस्सूर आणि अवपल्ली रोड येथे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. ही स्फोटके स्विच सिस्टमसह जोडण्यात आली होती. नक्षलविरोधी मोहीमेवर जाणाऱ्या सैनिकांच्या तुकडीला आणि सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी हा भयानक कट रचला होता. हे आयईडी वेळीच डिफ्यूज करून जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. डीआरजी आणि सीआरपीएफच्या 196 बटालियनच्या पथकाने आयईडी जप्त केली. त्यानंतर बीडीएस टीमने ती डिफ्यूज केली. जर हा स्फोट झाला असता तर त्यामुळे मोठा घातपात झाला असता.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर सतत कारवाई सुरू आहे. शनिवारी विजापूरमध्ये नक्षलवादी कारवाईदरम्यान आठ नक्षलवादी ठार झाले. याआधीही विजापूर, कांकेर आणि नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. बस्तर आणि बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांना सतत मागे हटण्यास भाग पाडले जात असल्यामुळे नक्षलवादी संघटनेत घबराट पसरली आहे. त्यामुळेच नक्षलवादी घातपात घडवण्याचा कट रचत आहेत.
16 लाखांचे बक्षीस असलेले नक्षलवादी ठार
शनिवारी बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवली आहे. यासंदर्भात, बिजापूरचे एसपी डॉ. जितेंद्र यादव यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे. या चकमकीत एकूण 8 नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यांच्यावर एकूण 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. या चकमकीत 24 वर्षी नक्षलवादी कमलेश नीलकंठ मारला गेला. त्याच्यावर 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवादी कमलेश हा नक्षलवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागांतर्गत गंगलूर क्षेत्र समितीचा सदस्य होता. याव्यतिरिक्त अन्य नक्षलींवरील कारवाईसाठी सुरक्षा दलाकडून मोठी रक्कम जाहीर करण्यात आली होती.
रविवारी दुपारी कांकेरमध्ये चकमक
बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर दुसऱ्याच दिवशी कांकेरमध्ये नक्षलवाद्यांशी संघर्ष झाला. ही नक्षलवादविरोधी कारवाई रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कांकेर आणि नारायणपूरच्या सीमेवर झाली. कांकेर पोलीस आणि सुरक्षा दलांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या माड विभागाचे सदस्य कांकेर आणि नारायणपूर सीमेवर कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्याने कारवाई सुरू केली. कांकेर सीमेवर झालेल्या चकमकीत अधूनमधून गोळीबार सुरू होता. या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेल्याची माहिती पसरली असली तरी सुरक्षा दलाकडून रात्रीपर्यंत नेमका आकडा जाहीर करण्यात आला नव्हता.