डच राजकन्यांच्या हत्येचा कट उधळला
पोलिसांनी टाळला मोठा हल्ला : संशयिताला अटक
वृत्तसंस्था/ अॅमस्टरडॅम
नेदरलँडच्या राजकन्या, कॅथरीना-अमालिया (22 वर्षे) आणि त्यांची बहिण राजकन्या एलेक्सिका (20 वर्षे) यांच्या हत्येचा कट डच अधिकाऱ्यांनी उधळला आहे. या प्रकरणी 33 वर्षीय संशयिताला हेग येथून अटक करण्यात आली आहे. संशयिताकडून दोन कुऱ्हाडी हस्तगत करण्यात आल्या असून त्यावर एलेक्सियाचे नाव, मोसाद आणि सीग हील (नाझी अभिवादन) कोरलेले होते. तसेच आरोपीकडून एक हस्तलिखित नोट मिळाली असून त्यावर अमालिया, एलेक्सिया आणि रक्तस्राव असे शब्द लिहिले गेले होते.
संशयित आरोपी कट्टरवादी असल्याचे मानले जात आहे. आरोपीला सोमवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर हत्येचा कट उधळण्यात आल्यावर डच राजघराण्याने राजा दिनाच्या (कोनिंग्सडेन) सोहळ्यांना जारी ठेवले राजे विलेम-अलेक्झेंडर यांच्या 59 व्या जन्मदिनी राजघराण्याचे सदस्य रस्त्यांवरील उत्सवात सामील झाले.
यापूर्वी मिळाल्या होत्या धमक्या
राजकुमारी कॅथरीना-अमालिया यांना यापूर्वीही अनेकदा गंभीर धमक्या प्राप्त झाल्या होत्या. ज्यात ड्रग कार्टेलशी निगडित अपहरणाची भीतीही सामील आहे. 2020-23 दरम्यान कॅथरीना यांना सुरक्षेच्या कारणास्तव अॅमस्टरडॅम सोडून माद्रिद शहरात जावे लागले होते. तर आतापर्यंत हत्येच्या कटामागील उद्देशाचा खुलासा झालेला नाही.