भूखंड घोटाळ्यातील सूत्रधार मोहम्मद सुहेल ‘ईडी’च्या ताब्यात
पणजी : गोव्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या भूखंड हडप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहेल ऊर्फ मायकल याला अमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ईडीने संशयित मोहम्मद सुहेल याला कोलवाळ कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अमलबजावणी संचालनालयाने भूखंड हडप घोटाळा प्रकरणात सुरू केलेल्या तपासात हा तपास सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. कारण गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने दाखल केलेली तक्रार आणि आरोपपत्रानंतर ईडीने ह्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्या तपासानुसार मोहम्मद सुहेल हा ह्या भूखंड हडप करणाऱ्या टोळीचा ‘मास्टरमाइंड’ आहे. तो आणि त्याची पत्नी अंजूम शेख हे दोघे भूखंडाची निवड करत होते. त्यानंतर बनावट मृत्यू दाखला तयार करून खोटा वारसदार प्रक्रियेसाठी सरकारी कार्यालयात उभे करीत होते.
सरकारी खात्यातील नोंदीमध्ये फेरफार करून मालकी हक्काचा बनावट प्रकरणांचा इतिहास ते करीत होते. अशाच पद्धतीने हणजूण येथील एका भूखंडाचा बोगस वारसदार उभा करून तो भूखंड विकण्यात आला होता. त्यामुळे सुमारे 50 लाख ऊपयांचा काळा पैसा तयार झाला. ईडीने जमीन हडप प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात ह्या टोळीला उजेडात आणले. हे सर्व आश्चर्य करण्यासारखे आहे. यापूर्वी एका संबंधित प्रकरणात ईडीने मोहम्मद सुहेल आणि इतर 35 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावेळी सुहेलने स्वत: शंभराहून अधिक भूखंड बेकायदेशीरपणाने मिळविल्याचे कबूल केलेले आहे. आतापर्यंत ईडीने सुहेलच्या 52 बेकायदेशीर मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. त्याचे एकूण मूल्य 232.73 कोटी ऊपये इतके आहे.
जमीन घोटाळ्यातील महत्त्वाचे मुद्दे :
- जमीन हडप घोटाळ्यातील मास्टरमाइंड कारागृहातून ताब्यात
- ईडीकडून आतापर्यंत 35 जणांवर आरोपपत्र सादर
- स्मोहम्मद सुहेल याच्या 52 बेकायदेशीर मालमत्ता जप्त
- जप्त केलेल्या मालमत्तेचे 232.73 कोटी ऊपये मूल्य
- संशयिताची पत्नीही करीत होती भूखंडाची निवड