For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याची दुर्दशा

10:30 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक शाहूनगर रस्त्याची दुर्दशा
Advertisement

मोठमोठे खड्डे-खाचखळगे : वाहनधारकांचे वाहने चालवताना कसरत

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक ते महानगरपालिका हद्दीतील शाहूनगरपर्यंतच्या फक्त एक किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी वाहनधारकां बरोबर चारचाकी वाहनधारकांनासुध्दा वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्याच्या डांबरीकरणाबद्दल ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊनसुद्धा शासकीय अधिकाऱ्यांबरोबर ग्रामीण भागाच्या लोकप्रतिनिधींनी सुध्दा कानडोळा केला आहे. परंतु पावसाळा सुरू होण्यापूर्वी फक्त एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक गावच्या हाकेच्या अंतरावर महानगरपालिकेच्या शाहूनगर वसाहतीची हद्द सुरू होते. सदर रस्त्याचे डांबरीकरण होऊन सात ते आठ वर्षे होऊन गेली. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खाचखळगे पडले आहेत. ग्रामीणच्या आमदार सदर खाचखळगे पडलेल्या रस्त्यावरून अनेकवेळा कंग्राळी गावाला आल्या. तरीदेखील अजून रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही हे गावचे दुर्दैव म्हणण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.

Advertisement

ग्रा. पं. सदस्यांचेही दुर्लक्ष

कंग्राळी बुद्रुक गावच्या ग्राम पंचायतीमध्ये एकूण 13 वॉर्ड आहेत. तर सदस्य संख्या 34 आहे. परंतु ग्रा.पं. सदस्यांना गावच्या विकासापेक्षा ग्रा. पं. अध्यक्ष उपाध्यक्ष बदलण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. मागील ग्रा. पं. निवडणुकीपासून अडीच वर्षासाठी अध्यक्ष-उपाध्यक्ष याप्रमाणे पाच वर्षात फक्त दोनच अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड घेऊन गावच्या सर्वांगीण विकास करणे असे शासनाचे धोरण आहे. परंतु कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. मध्ये अडीच वर्षामध्ये दोन अध्यक्ष, उपाध्यक्ष झाले. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. परंतु त्यांच्यावरही अविश्वास ठराव पास करून परंतु अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करणार असल्याची नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे.

हाच रस गावच्या सर्वांगीण विकास कामामध्ये दाखवण्याची मागणी

कंग्राळी बुद्रुक गावातील नागरिकांना दररोज ताजे पाणी मिळावे म्हणून शासनाकडून सदर योजनेला 8 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून सदर योजना अजून अपूर्णच आहे. यामुळे नागरिकांना अजून दुचाकी किंवा सायकलीवरून दुसरीकडून पिण्याचे पाणी आणून पाणी प्यावे लागत आहे. तसेच गावचा रस्त्यांचे डांबरीकरण होऊन 7 ते 8 वर्षे झाली. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खाचखळगे पडले आहेत. परंतु या समस्येकडेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. पंचायतमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाबदली सोडून सर्वांनी एकीच्या माध्यमातून जे खुर्चीवर आहेत त्यांना सामावून घेऊन शासनाकडून विकासासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करून गावचे नंदनवन करून घेण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.