जांबोटी-खानापूर राज्यमहामार्गाची दुर्दशा
वाढत्या अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब : अपघातांच्या वारंवार घटना; रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची नागरिकांतून मागणी
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची दुर्दशा झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून तसेच वाहनधारकांमधून होत आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. खानापूर तालुक्यातील आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता म्हणून गणला जातो. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. सद्यस्थितीमध्ये या रस्त्याची रुंदी केवळ साडेतीन मीटर तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी वेडीवाकडी अवघड वळणे असल्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून गोवा, हुबळी-धारवाड तसेच उत्तर कर्नाटकातील महत्त्वाच्या शहरांमध्ये माल व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. मात्र वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. कान्सुली फाटा ते मोदेकोप फाटा दरम्यानच्या रस्त्याची दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे केवळ एका वर्षातच या रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्यामुळे या ठिकाणाहून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच मलप्रभा नदीवरील शंकरपेठ पुलानजीकच्या रस्त्याची अवस्था देखील दयनीय बनली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अनमोड घाटमार्ग बंद झाल्यामुळे वाहतुकीमध्ये वाढ
गेल्या दोन-चार दिवसांपासून बेळगाव-पणजी व्हाया अनमोड राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे हा रस्ता काही दिवस वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून गोवा, हुबळी, धारवाड आदी ठिकाणी जाणारी वाहने खानापूर-जांबोटी-चोर्ला-पणजी या पर्यायी मार्गाचा वापर करीत असल्यामुळे जांबोटी-खानापूर महामार्गावर मालवाहतूक करणारी अवजड वाहने तसेच कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस व प्रवासी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी रस्त्यावर वाहतुकीचा अधिक ताण पडल्यामुळे रस्त्याच्या दुर्दशेमध्ये भर पडली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खानापूर विभागाच्या अभियंत्याने लक्ष घालून जांबोटी-खानापूर महामार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.