कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची दुर्दशा

10:42 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निधी मंजूर होऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष, वाहनधारकांमधून नाराजी

Advertisement

वार्ताहर/जांबोटी

Advertisement

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची पार दुर्दशा झाली असून 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्य महामार्ग क्र. 31 अंतर्गत होतो. आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने खानापूर तालुक्यातील हा महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून गोवा, हुबळी, धारवाड, बेंगळूर तसेच कोकण आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल व प्रवासी वाहतूक चालते.

मात्र या रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी कर्नाटक राज्य महामार्ग विकास निधी अंतर्गत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. दोन वर्षापूर्वी या रस्त्याचा बहुतांश भाग सुस्थितीत होता. परंतु बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील कुसमळी नजीकच्या ब्रिटिशकालीन पुलावरून अवजड वाहतूक बंदीचा आदेश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला होता. त्यामुळे बेळगाव-गोवा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाचा वापर होऊ लागल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे.

जांबोटी-खानापूर या रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर आहे.हा रस्ता सपूर्ण जंगल भागातून गेला असून या रस्त्याची वजन पेलण्याची क्षमता केवळ 15 ते 20 टन मर्यादित आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू राहिल्याने या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच दारोळी फाटा ते मोदेकोप, कान्सुली फाट्यादरम्यान या रस्त्यावर नावालाच डांबर शिल्लक आहे.

पावसाळ्यापूर्वी कंत्राटदाराने दुरुस्तीच्या नावाखाली मोदेकोप फाटा ते कान्सुलीपर्यंतचा रस्ता उखडून काढल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून  बाजूपट्ट्या देखील पूर्णपणे खचल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे जिकीरीचे बनले आहे. सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था एखाद्या अॅप्रोच रस्त्याला लाजवेल अशीच झाली आहे. खराब व अरुंद रस्त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मागील आठवड्यात खराब रस्त्यामुळे मोदेकोपजवळ एका युवकाचा अपघातामध्ये बळी गेला आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीचे केवळ आश्वासनच

जांबोटी-खानापूर राज महामार्गाची पार दुर्दशा झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीला अयोग्य बनल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी नागरिकांनी वारंवार लावून धरली धरली होती. केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुरुस्तीसाठी गेल्यावर्षी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या मे महिन्यापासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित कंत्राटदाराने हाती घेतले. मात्र पावसाला सुरुवात झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून कंत्राटदाराने रस्त्याचे काम बंदच ठेवले आहे. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणलेल्या मशिनरी जागोजागी धूळखात पडल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्ती कामासंदर्भात नागरिकांमधून साशंकता व्यक्त होत असून 6 कोटी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेळगाव विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article