For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प

10:44 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या : पोलिसांनी अमली पदार्थांचे उत्पादन-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, नूतन पोलीस उपनिरीक्षकांना शुभेच्छा

Advertisement

बेंगळूर : कर्नाटकला अमली पदार्थमुक्त करणे हा राज्य सरकारचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. रविवारी म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीमध्ये म्हैसूर युनिटच्या सिव्हिल पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींच्या 46 व्या तुकडीच्या पदवीदान समारंभात सहभागी होऊन आपले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व पोलीस उपनिरीक्षकांना शुभेच्छा दिल्या. सरकारने अमली पदार्थमुक्त समाज घडवण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. अमली पदार्थांचा तऊणांवर घातक परिणाम होतो. जर हे समूळ नष्ट केले नाही तर समाजाचे आरोग्य टिकवता येणार नाही. त्यामुळे या दिशेने प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. अमली पदार्थांचा पुरवठा आणि उत्पादन थांबवून राज्याला अमली पदार्थमुक्त राज्य बनवण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. सरकार या दिशेने काम करत आहे. या संदर्भात पोलिसांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी नेहमी जनहितैषी आणि माणुसकीने काम केले पाहिजे. त्यांनी जनतेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत गुन्हेगारांवर दया दाखवू नये. न्यायदानाच्या कामात पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नये. प्रत्येकाला संरक्षण आणि समान संधी दिली पाहिजे. पोलीस सेवेत शिस्त, संयम, प्रामाणिकपणा आणि माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. समाजात जातीय व्यवस्था आहे. गरीब, दलित, दिव्यांग आणि महिलांचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. जेव्हा महिला मध्यरात्री निर्भयपणे फिरू शकतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होईल, असे महात्मा गांधी म्हणाले होते. समाजातील प्रत्येकाला आर्थिक आणि सामाजिक समानता मिळाली पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही कारणास्तव न्याय प्रस्थापित करण्याच्या कामाशी तडजोड करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Advertisement

पोलिसांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपली कर्तव्ये पार पाडावीत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. समाजातील दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाला संरक्षणाची समान संधी मिळावी यासाठी पोलिसांनी काम करावे. अलिकडच्या काळात सायबर गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी योग्य प्रशिक्षण दिले जात असून सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला. याप्रसंगी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, समाजकल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश, पोलीस महासंचालक सलीम यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.