For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी जोतिबा देवाला साकडे

12:55 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी जोतिबा देवाला साकडे
Advertisement

सीमासमन्वय मंत्र्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाला गती मिळावी व मराठी भाषिकांवरील अन्याय कमी व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सीमासमन्वय मंत्रिपदी दुसऱ्यांदा चंद्रकांतदादा पाटील यांना संधी दिली. परंतु एकदाही त्यांनी बेळगावला भेट देऊन मराठी भाषिकांच्या वेदना जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांना सद्बुद्धी येवो आणि सीमावासियांना न्याय मिळो, असे साकडे सीमावासीयांनी दख्खनचा राजा जोतिबाला घातले.

सीमाप्रश्नासंदर्भात म.ए. समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट मिळण्यासंदर्भात चंद्रकांतदादांना पत्र दिले आहे. सीमासमन्वय मंत्रिपदी निवड झालेले चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांनी एकदाही बेळगावला भेट दिली नाही. सीमाप्रश्नाला गती मिळावी, यासाठी तज्ञ व उच्चाधिकार समितीची बैठक होणे गरजेचे आहे. यासाठी सीमासमन्वय मंत्र्यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परंतु, सीमासमन्वय मंत्र्यांकडून पाठपुरावा होत नसल्याने मराठी भाषिक नाराज आहेत.

Advertisement

2004 पासून सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव आणून आसाम-मेघालय, आसाम-मिझोराम या धर्तीवर केंद्र सरकारकडून सीमाप्रश्न सोडवला जावा, यासाठी चंद्रकांतदादा पाटलांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. अनेक वेळा निवेदने देऊनदेखील चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अंमलबजावणी होत नसल्याने अखेर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोल्हापूर येथील जोतिबा डोंगरावर जाऊन जोतिबालाच साकडे घातले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विजय भोसले, भाऊराव पाटील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.