पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल मॅचनंतर खेळाडूची हत्या
कोलकाता:
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या उपनगरीय भागात एका फुटबॉल मॅचदरम्यान झालेल्या वादातून 17 वर्षीय फुटबॉलपटूची धारदार अस्त्राने गळा चिरत हत्या करण्यात आली आहे. मृताची नाव प्रसेजनजीत बिस्वास असून मॅचमधील पराभवाचा सूड उगविण्यासाठी विरोधी गटातील तीन युवकांनी त्याचा जीव घेतला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असली तरीही या घटनेमुळे पूर्ण भागात तणाव निर्माण झाला आहे. फुटबॉल मॅच संपल्यावर तिन्ही आरोपींनी प्रसेनजीतला निर्जनस्थळी नेले होते. तेथे पोहोचताच तिन्ही आरोपींनी धारदार अस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ प्रसेनजीतला परिसरातील लोकांनी त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथील जमाव संतप्त झाला. या जमावाने रुग्णालय परिसरातील पोलीस चौकीमध्ये तोडफोड केली आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त तुकडी मागवावी लागली.