देवाच्या प्रसादाशी खेळ
तिरुपती देवस्थानमधील लाडूच्या प्रसादात हलक्या दर्जाचे आणि चरबी वापरलेले तूप उपयोगात आणण्याचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे. ठेकेदार, कंत्राटदार किंवा पुरवठादार नावाचा जो प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर उदयाला आला आहे आणि त्यांच्या निमित्ताने भ्रष्टाचार करणाऱ्यांची एक मोठी साखळी निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आता देवाच्या दारातही दिसू लागला आहे.
केवळ तिरुपतीच नाही, तर भारतामधील ज्या प्रमुख देवस्थानांमध्ये अशा प्रकारचा प्रसाद दिला जातो आणि काही देवस्थानांमध्ये तर महाप्रसादही दिला जातो अशा सर्वच देवस्थानांमध्ये कोणत्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केला जात असेल याबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. भारतात कोठेही 320 रुपये किलोने शुध्द तूप मिळत नसताना हा पुरवठादार ते कसे पुरवतो? याची शंका देवस्थानाच्या अधिकाऱ्यांना आली नसेल तर तेही यात संशयित आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटले तरी प्रसाद बनवणाऱ्या मंडळींना याची शंका कशी काय आली नसेल? हा खरेतर पोलीस तपासाचा भाग आहे. कठोरपणे हा विषय हाताळला पाहिजे. देशात शाकाहार करणारे आणि मांसाहार करणारे असे दोन जातीय, धर्मीय घटक आहेत आणि त्यांच्या श्रद्धा, धारणा यांचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे. शाकाहारी व्यक्तीला चरबीचे तूप खायला घालून जसा अपराध झाला आहे त्याहून अधिक अपराधीपणाची भावना घेऊन तिरुपतीच्या भक्ताला संपूर्ण आयुष्य काढायचे आहे आणि वेळोवेळी त्याला याची खंत वाटत राहणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भक्त जेव्हा तिरुपतीसारख्या देवस्थानाला जातात तेव्हा ते आवर्जून लाडू प्रसाद खरेदी करतात आणि आपल्या गावी परत आल्यानंतर अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना प्रसादाचे वाटप करतात. त्यामागे प्रसादाचा लाभ आपल्या आप्तांना मिळावा अशी त्यांची भावना असते. ज्या कालावधीमध्ये अशा कमी गुणवत्तेच्या प्रसादाची निर्मिती होत होती त्या कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी तिरुपतीचा लाडू प्रसाद ग्रहण केला त्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. शिवाय आपण आपल्या आप्तांना देखील यात ओढले अशी अपराधी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असेल तर ती चुकीची नाही. मात्र श्रध्देला तडा जाण्यासारखी ही घटना घडल्याने होणारे नुकसान मोठे आहे. यामुळे त्यांच्या मनातसुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण झाली असेल. त्याचप्रमाणे लाडू प्रसादासारख्या पदार्थामध्ये जेव्हा अशा प्रकारची चरबी मिसळलेली लक्षात येते तेव्हा मंदिर व्यवस्थापनास देखील ते दोष देणारच. त्यांच्या मानसिकतेवर याचा बरावाईट परिणाम हा होणारच आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रसाद व्यवस्था, मंदिर व्यवस्था आणि एकूण व्यवस्थापन या सर्वांची चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अटक करून चौकशी सुरु झाली पाहिजे. प्रसादाचा दर्जा पूर्वीप्रमाणे राखला जात नसल्याची तक्रार भक्तांकडून अनेकदा झाली होती. अगदी जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना भक्तांनी त्यांना ट्विट करून हा प्रसाद टिकत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दर्जा सुधारला आहे असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात व्यवस्था भ्रष्ट असल्याने तो खेळ तसाच सुरू राहिला. अलीकडे खूपच तक्रारी होऊ लागल्यावर प्रशासकीय मंडळाने तपासणी केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आता यापुढे सर्व भक्तांना शुद्ध तुपातील आणि गुणवत्ता राखलेलाच लाडू प्रसाद दिला जाईल अशी खात्री देवस्थान समितीने आणि सरकारनेसुध्दा दिली पाहिजे. देशातील अशा सर्वच देवस्थानांमध्ये जो काही प्रसाद पुरवठा केला जातो त्याची गुणवत्ता राखली जाते का नाही याची खात्री करावी लागणार आहे. अन्यथा भक्तांकडून प्रसाद नाकारला जाण्याचे आणि प्रसादावरच अविश्वास दाखवण्याचे प्रकार सुरू होतील. लोक स्वत:च त्यावर आपल्यापुरता तोडगा काढतील. मात्र त्यामुळे देशातील मोठ्या मंदिरांची पत पणाला लागेल हे निश्चित. प्रसादामध्ये चरबी आणि माशाचे तेल वापरल्याचे तपासणी अहवालातून सिद्ध झाल्यावरही या विषयाबाबत भक्तांनी संयम बाळगला हा त्यांचा व्यवस्थापनावर नव्हे तर देवावर असलेला विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा देण्याचे काम अशा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पुरवठादार करत आहेत. तिरुपतीमध्ये असे काही झाले आहे का आणि कुठल्या पातळीवर? याचा शोध मात्र तपास यंत्रणांनी घेतला पाहिजे आणि श्रध्देचा गुन्हेगार समाजासमोर आणला पाहिजे. त्यासाठी खबरदारी म्हणून सरकारने सर्वच देवस्थानांना प्रसादाची शुद्धता राखण्यासाठी सर्वोच्च काळजी घ्यावी आणि कच्च्या मालाच्या पुरवठादारांवर लक्ष ठेवावे, असे आदेश देण्याची गरज आहे. सरकारच्या अन्न तपासणी करणाऱ्या यंत्रणा डोळेझाक कशा काय करू शकतात? त्यांना त्या तुपाची शंका का आली नाही? लाडू वर शाकाहारी असल्याची हिरवी टीक कशी काय लावली गेली याचा जाब सरकारने आपल्या या यंत्रणेला देखील विचारला पाहिजे. तातडीची कारवाई म्हणून तिथला संपूर्ण विभाग निलंबित केला पाहिजे आणि नंतर त्यांना चौकशीला बोलावले पाहिजे. इथे सारे होऊनही यंत्रणेला काही होत नाही असा संदेश या प्रकरणात गेला तर तो भक्तांना सर्वोच्च धक्का असेल. त्यांच्या भावनेला काही किंमत नाही असा संदेश जाईल. तसा तो सरकारने जाऊ देता कामा नये. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूर्व मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात असा हलक्या दर्जाचा लाडू वितरीत होत होता असा आरोप केला आणि त्यानंतर तसे अहवाल प्रसिद्ध झाले. यात रेड्डी दोषी असतील तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. मात्र केवळ हा विषय राजकीय करून चालणार नाही. यामागे जे अर्थकारण दडले आहे ते उघडकीस आणले पाहिजे आणि किमान आता यापासून पुढे तरी असा खेळ होणार नाही याची ग्वाही जनतेला दिली पाहिजे. तिरुपतीला देशभरातून भक्त येत असतात त्यामुळे हा संदेश त्यांनी सर्व भाषेत लोकांपर्यंत पोहोचवलाच पाहिजे. शिवाय दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. केवळ मुद्दा राजकीय करून त्याचा वेळोवेळी वापर करत न बसता दोषींना थेट जेल वारी घडवली पाहिजे. ठेकेदार काळ्या यादीत टाकला तर नाव बदलून तो पुन्हा येतोच हा देशातील विविध प्रकरणातील अनुभव आहे. असे लोक उघड करणे महत्त्वाचे आहे. शिवाय देशातील सर्वच देवस्थानात याबद्दल तपासणी झाली पाहिजे. आधीच मंदिरातील सोन्याची लूट हा विषय गाजतोय त्यात प्रसादाचे हे नवे प्रकरण भक्तिला धक्का देणारे ठरू नये.