For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील प्लास्टिक जनावरांना धोकादायक

10:02 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील प्लास्टिक जनावरांना धोकादायक
Advertisement

गायीच्या पोटातून काढले 50 किलो प्लास्टिक,  हृदयद्रावक घटना

Advertisement

बेळगाव : शहरात पडून असलेला कचरा भटक्या जनावरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. एका भटक्या गायीच्या पोटातून तब्बल 50 किलो प्लास्टिक शस्त्रक्रिया करून काढण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहरातील कचऱ्यातील प्लास्टिकचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महांतेशनगर येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे गायीला जीवदान मिळाले आहे. या हृदयद्रावक घटनेने पशुपालकांतून हळहळ व्यक्त होत आहे. शहरात दिवसेंदिवस कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. विशेषत: यामध्ये प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान वेळेत उचल होत नसल्याने भटकी जनावरे यावर ताव मारू लागली आहेत. दरम्यान टाकाऊ खाद्यपदार्थांबरोबर जनावरांच्या पोटात प्लास्टिकही जाऊ लागले आहे. अशाप्रकारे एका भटक्या गायीच्या पोटात गेलेले तब्बल 50 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आहे.

या घटनेमुळे शहरातील प्लास्टिक कचऱ्याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने हे प्रकार घडू लागले आहेत. मनपा प्रशासनाकडून ओला व सुका कचरा वर्गीकरण केला जातो. मात्र काही ठिकाणी ओला व सुका कचरा एकाच ठिकाणी पडून असतो. दरम्यान खाद्याच्या शोधात भटकी जनावरे ढिगाऱ्यांवर फिरत असतात. टाकाऊ खाद्याबरोबर जनावरांच्या पोटात प्लास्टिक जात असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे भटक्या जनावरांसाठी प्लास्टिकचा कचरा जीवघेणा ठरू लागला आहे. गायीच्या पोटात प्लास्टिक गेल्याचे निदर्शनास येताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गायीला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. डॉ. शशीधर नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. बी. सन्नक्की, डॉ. महादेव मोळट्टी, डॉ. आनंद संगमी, डॉ. विनय संग्रोळी आदींनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. गायीच्या पोटातून प्लास्टिकसह खिळे आणि लोखंडी साहित्यही बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल पशुपालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.