प्लास्टिक स्ट्रॉवर 1 जुलैपासून बंदीची तयारी
अमूलकडून पीएमओला पत्र : दिलासा देण्याची विनंती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिटबंद ज्यूस आणि डेअरी उत्पादनांसोबत मिळणाऱया प्लास्टिक स्ट्रॉवर सरकार 1 जुलैपासून बंदी घालण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठा डेअरी समूह अमूलने सरकारला पत्र लिहिले आहे. प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी टाळण्याची विनंती अमूलने केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक असलेले देशातील शेतकरी अन् दूधाच्या मागणीवर नकारात्मक प्रभाव पडणार असल्याचे अमूलने म्हटले आहे.
अमूलपूर्वी अनेक बेव्हरेज कंपन्यांनी प्लास्टिक स्ट्रॉ प्रकरणी सूट देण्याचे आवाहन केले होते. परंतु सरकारने हे आवाहन फेटाळले होते. अमूलने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून भूमिका मांडली आहे. प्लास्टिकचे स्ट्रॉ दूधाची मागणी वाढविण्यास मदत करत असल्याचे विधान अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोढी यांनी केले आहे.
सरकारच्या या निर्णयाने अमूल, पेप्सिको आणि कोका-कोला समवेत अनेक बेव्हरेज कंपन्यांना झटका बसला आहे. सरकारने स्वतःची भूमिका बदलण्यास नकार देत कंपन्यांना पर्यायी स्ट्रॉचा वापर करण्यास सांगितले आहे. या कंपन्यांनी प्लास्टिक स्ट्रॉसाठीचा पर्याय वापरात आणण्यासाठी सरकारकडून वाढीव मुदत मागितली आहे. तर काही कंपन्यांनी बंदीची शक्यता पाहता इंडोनेशिया आणि अन्य देशांमधून पेपर स्ट्रॉ आयात करण्याचा विचार चालविला आहे.