Mahabaleshwar News | 'मिनी काश्मीर'मध्ये वन विभागाचा मोठा अॅक्शन प्लॅन; महाबळेश्वरला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी उचलले 'हे' मोठे पाऊल!
‘मिनी काश्मीर’ महाबळेश्वर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार
पाचगणी ( इम्तियाज मुजावर ) -महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर अभियानाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. सातारा वन विभागाच्या पुढाकारातून छत्रपती प्रतापसिंह वनउद्यान येथे या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वेण्णा लेक परिसरात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र वाढत्या पर्यटनामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाणही वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरणाचे रक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि स्वच्छ पर्यटनस्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. महाबळेश्वरची नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर वेण्णा लेक परिसरात स्वच्छता व प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल प्रशासन, नगरपरिषद, पोलीस प्रशासन, पत्रकार संघटना, हिलदारी संस्था तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, तहसीलदार सचिन मस्के, गटविकास अधिकारी विजय विभुते, मुख्याधिकारी योगेश पाटील, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर हा केवळ एक उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाबळेश्वरच्या निसर्गसंपदेचे जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचला असून महाबळेश्वरला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.