खानापुरात प्लास्टरच्या गणेशमूर्तींवर बंदी
शाडू-मातीच्या मूर्ती करण्याचे आदेश : नगरपंचायतीमध्ये मूर्तिकारांच्या बैठकीत माहिती
खानापूर : शहरातील गणेश मूर्तिकारांनी छोट्या व मोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करू नयेत. त्याऐवजी माती आणि शाडूच्या गणेशमूर्ती कराव्यात. तसेच रासायनिक रंग वापरू नयेत. मूर्तीत धातूचा वापर करू नये, अशा सूचना नगरपंचायतीच्या सभागृहात खानापूर शहरातील मूर्तिकारांच्या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा जया भूतकी, स्थायी समिती चेअरमन अप्पय्या कोडोळी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर उपस्थित होते.
प्रेमानंद नाईक यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टरच्या गणेशमूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मूर्तिकारांनी या नियमांचे पालन करावे, शाडू आणि मातीच्या मूर्ती कराव्यात. तसेच रासायनिक रंग आणि मूर्तीत कोणत्याही अन्य धातूंचा वापर करू नये, प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केल्यास मूर्ती जप्त करण्यात येतील, अशीही माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी उपस्थित असलेल्या गणेशमूर्तिकारांनी या निर्णयाबाबत तीव्र आक्षेप नोंदविले. मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष जोतिबा कुंभार ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टरच्या मूर्तीवर बंदी आणण्यात यावी, म्हणून सहकार्याची भूमिका घेत आहोत. मात्र शासनाकडून याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही. तसेच गणेशोत्सव अगदी तेंडावर आल्यावर दरवर्षी बैठकीचे आयोजन करून कारवाईची भीती दाखविण्यात येते. जानेवारी महिन्यातच याबाबत नागरिकांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे मूर्तिकारांना मूर्ती बनवताना प्लास्टरच्या मूर्तीऐवजी मातीच्या मूर्ती बनविणे सोयीचे होणार आहे.
एक वर्ष अगोदर जागृतीची गरज
आता सर्व मूर्ती तयार असून रंगकाम सुरू आहे. अशावेळी शासनाकडून आम्हाला वेठीस धरले जाते. शहरात एकूण 20 मूर्तिकार आहेत. आम्ही सर्व मूर्तिकार शाडूच्या मूर्ती करण्यास तयार आहोत. मात्र बाहेरील विक्रेते दरवर्षी मोठ्याप्रमाणात प्लास्टरच्या मूर्ती आणून विक्री करत आहेत. त्यावर शासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. जर प्लास्टरच्या मूर्तीवर पूर्णपणे बंदी आणायचे असल्यास एक वर्ष अगोदर जागृती करून पूर्णपणे मातीच्या मूर्ती बनविण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. अन्यथा फक्त प्लास्टरच्या मूर्तीवर बंदीचा फार्स ठरत आहे.