Konkan Farmers Issues : रत्नागिरीत बागायतदारांचे 7 कोटींचे नुकसान
शासनाकडे धाव घेत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षी आंबा, काजू पिकांसाठी शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 'आंबिया बहार' योजनेंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यामध्ये ३६ हजार ८४१ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेत २०,७३३.३० हेक्टरवरील पीक संरक्षित केले होते. पण गतवर्षी विमा कंपन्यांच्या धोरणांचा फटका जवळपास सव्वाचार हजार शेतकऱ्यांना बसला आहे. याविरोधात शासनाकडे धाव घेत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
विम्याची मागणी करण्यासाठी मंडल स्तरावर पर्जन्यमापक व तपमानमापक यंत्रणेचा आधार घेतला जातो. अवकाळीमध्ये ६५ मिमी पावसाची नोंद त्यासाठी व्हावी लागते तर तपमान ३६ अंशापेक्षा अधिक जावे लागते. तीन दिवस सलग ३६ अंशापेक्षा अधिक तपमान असेल तर शेतकऱ्यांना विमा लागू होतो. मात्र गतवर्षी दोन दिवस ३६ अंशापेक्षा अधिक आणि एक दिवस ३५ अंश तापमान अशी स्थिती जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये निर्माण झाली होती.
त्यामुळे जवळपास सव्वाचार हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. यावर निर्णय देताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे विमा कंपन्यांनी आयुक्तांकडे धाव घेतली असता त्याठिकाणीही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी आता सचिव पातळीवरील समितीकडे सुरू आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्यास जवळपास ७ कोटीची विमा रक्कम उर्वरीत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी विभाग स्तरावरून सांगण्यात येत आहे.