बेकवाड-बिडी भागात रोप लागवड कामाला सुरुवात
वार्ताहर/नंदगड
झुंजवाड, बेकवाड, बिडी, नंजिनकोडल भागात हंगामानुसार बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी भात पेरणी वेळेनुसार झाली आहे. त्यातच गेला आठवडाभर दमदार पाऊस पडल्यामुळे भातशेतीत मुबलक पाणी झाले आहे. त्यामुळे हंबडणीची व भात रोप लागवडीची कामे सुरू आहेत. बेकवाड, बिडी भागातील निम्म्याहून अधिक शेतवडीत भाताचे पीक घेतले जाते. उर्वरित जमिनीत ऊस, भुईमूग, मका पीक घेतले जाते. यावर्षी तब्बल महिन्याहून अधिक काळ पेरणी हंगामासाठी मुबलक पाऊस ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकासाठी ठेवलेल्या 90 टक्के जमिनीत भाताची पेरणी केली आहे. तर उर्वरित दहा टक्के जमिनीत रोप लागवड केली जात आहे. पेरणी करून वीस ते पंचवीस दिवस झाले असल्याने भात बऱ्यापैकी आले आहे. पेरलेल्या भात जमिनीत गेल्या आठवडाभरापासून ओली कोळपणी व हंबडणीची कामे उरकण्यात आली. तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून भात रोप लागवडीची कामे सुरू आहेत. रोप लागवडीसाठी मुबलक भाताचे तरु आहेत. शेतीकामे जोरात सुरू असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. सध्या रोप लागवड करणाऱ्या महिला मजुराला तीनशे रुपये प्रति दिवस मजुरी दिली जात आहे.