अन्य जलमार्गांवरही रो रो फेरीबोटी सुरू करण्याचा विचार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : चोडण-रायबंदर जलमार्गावर रो रो फेरीसेवा सुरू
डिचोली : रो रो फेरीबोटींवर सरकारने खर्च केलेला तो विजय मरिन कंपनीने केला आहे. या फेरीबोटीत प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी अल्प शुल्क लावले आहे. लोकांनी जर सकारात्मक सहकार्य केले तर अन्य आठ जलमार्गांवरही अशा प्रकारच्या फेरीसेवा देण्यासाठी सरकार विचार करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चोडण येथे बोलताना दिले. चोडणवासीयांना व मयेवासीयांना या सेवेचा चांगला उपयोग होणार असून त्यात अचानक आजारी पडलेल्या रूग्णांसाठी प्राथमिक उपचारांचीही सोय असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गेले दोन महिने या फेरीबोटीची बांधणी झाली होती. मात्र लोकांचे विविध प्रश्न होते. त्यासाठी 100 तास या रो रो फेरीची पाण्यात चाचणी घेण्यात आली. या सेवेतून लोकांची सुरक्षितता लक्षात घेण्यात आली आहे. या रो रो फेरीबोटीत कोणत्याही प्रकारचे वाहन प्रवेश करू शकते. या सेवेत केवळ चारचाकींना शुल्क लावले आहे. दुचाकींना शुल्क नाही. पर्यटकांना शुल्क लावण्यात आले आहे. चोडण भागातील लोकांसाठी ही सेवा मोफत असणार आहे, असे अंतर्गत जलमार्गमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.