इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ल्याची योजना?
अमेरिकेचा विरोध पण इस्रायलची सज्जता, मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/जेरुसलेम
इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्याची योजना इस्रायलने सज्ज केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र्। अद्याप यासंबंधी अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. अमेरिकेने अशा कोणत्याही योजनेला आपला विरोध असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, इस्रायलने सर्व प्रकारची सज्जता केली असून अणुकेंद्रांना लक्ष्य बनविले जाणार नाही, असे आश्वासन अद्यापही अमेरिकेला दिलेले नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाची तीव्रता प्रमाणाबाहेर वाढू नये, यासाठी अमेरिकेने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी हा संघर्ष लवकरात लवकर थांबवा, किमानपक्षी कमी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, इस्रायलने हमास आणि हिजबुल्ला या दोन दहशतवादी संघटनांचा नायनाट झाल्याशिवाय संघर्ष थांबविणे इस्रायलसाठी धोकादायक ठरेल, असे स्पष्ट केले आहे.
इराण अणुबाँबच्या उंबरठ्यावर?
इराणने अणबाँब बनविण्याचे प्रयत्न अनेक दशकांपासून चालविलेले आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही, असे काही तज्ञांचे मत आहे. अणुबाँब बनविण्यासाठी आवश्यक असे संपृक्त युरेनियम इराणजवळ आहे. मात्र, केवळ तेव्हढ्याने अणुबाँब तयार करता येत नाही. त्यासाठी इतर अत्याधुनिक आणि जटील अशी यंत्रणा आणि सामग्री लागते. ती जमा करण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी इराणला आणखी किमान सहा महिने ते एक वर्षभराचा कालावधी लागू शकतो, असेही अनेक अणुतज्ञांचे मत आहे. मात्र, इराण अणुबाँब निर्मितीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे, यावर अनेकांचे एकमत आहे.
इस्रायलला सर्वाधिक धोका
इराणने अणुबाँब तयार करण्यात यश मिळविल्यास इस्रायलला त्याचा सर्वाधिक धोका आहे. इस्रायलजवळही अनेक अण्वस्त्रे आहेत. इराणचे नेतृत्व अणुबाँबचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत न करण्याइतके समंजस आहे काय, असा प्रश्न तज्ञांकडून विचारला जात आहे. त्यामुळे इराणची अणुबाँबनिर्मितीची प्रक्रिया शक्य तितकी लांबविण्याचा इस्रायलचा विचार आहे. म्हणून इराणने अणुबाँब निर्माण करण्याच्या आधीच त्याच्या अणुकेंद्रांवर हल्ला करुन ती निकामी करण्याची योजना इस्रायलने सज्ज केली असल्याची चर्चा आहे. मात्र, इराणची अणुकेंद्रे भूमीखाली बऱ्याच खोलीवर आहेत. शिवाय ती देशभर पसरलेली आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी इस्रायलला विशेष प्रकारच्या बाँबची आवश्यकता आहे. हे बाँब इस्रायलजवळ आहेत. पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, अशीही चर्चा आहे.
तेलक्षेत्रावरही हल्ल्याची योजना
इराणची आर्थिक क्षमता खिळखिळी करण्यासाठी त्या देशाच्या तेलक्षेत्रावर हल्ला करण्याची योजना अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांची आहे. तथापि, तसे केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेला युरोपियन देशांचा विरोध असल्याचीही चर्चा आहे. तथापि, इस्रायल कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रतिशोध घेण्याच्या विचारात असल्याचे तज्ञांकडून निश्चित मानले जात आहे.
7 ऑक्टोबरला प्रतिशोध ?
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर अचानकपणे हल्ला करुन अनेक नागरीकांचे अपहरण केले होते. तसेच अनेक निरपराध्यांना ठार करुन महिलांवरही अत्याचार केले होते. या भीषण घटनेला उद्या सोमवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या दिवशी इस्रायल इराणवर हल्ला करुन या हल्ल्याचा सूड घेईल अशीही शक्यता आहे. हमासला इराणचे सक्रीय समर्थन आहे.
नसरल्लाचा वारसदारही ठार ?
इस्रायलने काही दिवसांपूर्वी लेबेनॉनवर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नसरल्ला हा ठार झाला होता. त्याच्या स्थानी अशीम सफिद्दिन याला प्रमुख बनविले जाणार होते. तथापि, सफिद्दिनही इस्रायलच्यला हल्ल्यात ठार झाल्याचे प्रतिपादन इस्रायलने केले आहे. या प्रतिपादनाला अद्याप हिजबुल्ला किंवा इराणने दुजोरा दिलेला नाही. तथापि, तो ठार झाल्या असण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे तज्ञांचे मत आहे. हिजबुल्लाचे आणखी दोन मोठे म्होरके इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत, असेही वृत्त आहे.