दशावतार कलाकारांसाठीच्या योजनांना स्थगिती द्यावी
सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांची सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागणी
प्रतिनिधी
बांदा
राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या दशावतार कलाकारांसंदर्भातील बहुतांशी योजनांचा फायदा थेट कलाकारांना मिळत नसल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे वृद्ध कलाकार मानधन योजना व्यतिरिक्त दशावतार लोककलेसाठी मिळणारे मानधन तसेच कलाकारांसाठीच्या सर्व योजनांना तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे. या संदर्भात इन्सुली श्री देवी माऊली मंदिरात झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.यावेळी जिल्हा भरातील दशावतारी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. इन्सुली येथील श्री देवी माऊली मंदिरात जिल्हाभरातील दशावतार कलाकारांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यात अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण दोन हजारावर दशावतार कलाकार आहेत.लोककला अनुदान शिफारस समिती, वृद्ध कलाकार मानधन समिती व पुरस्कार समितीवर कलाकारांनी शिफारस केलेल्या ज्येष्ठ कलाकारांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच सन २००८ पासून साहित्य संपदेसाठी दिले जाणारे १ लाख रुपये व २० प्रयोगांसाठी प्रायोगिक तत्त्वावर दिले जाणारे ३ लाख रुपये यापैकी एकाही योजनेचा फायदा दशावतार कलाकारांना होत नाही. याबाबत खुलासा होण्याची मागणी करण्यात आली.
तसेच दशावतार वेशभूषेसाठी असणाऱ्या किमान १० हजार खर्च कलाकारांना मिळणाऱ्या मनाधनातून करावा लागतो. सदर खर्च शासन अनुदानातून मिळावा. जिल्हाभरातील कलाकार हे कोणत्याही एका मंडळाचे नियमित सदस्य नाहीत. दरवर्षी कलाकारांची कंपनी बदलत असते. याची नोंद होण्यासाठी सर्व कलाकारांना शासनाकडून ओळखपत्र मिळावे. तसेच शासनाकडून मिळणारे अनुदान संबंधित कलाकारांच्या बँक खात्यात वर्ग करावे अशा अनेक मागण्या करण्यात आल्या.
या सभेला सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर अध्यक्ष विलास परब, सचिव संदीप कोनस्कर, खजिनदार नारायण आसयेकर, उपाध्यक्ष बाबुराव राणे, सल्लागार संतोष रेडकर, दादा राणे, उदय राणे, सदस्य जगदीश मोरजकर, काशिनाथ करमळकर, भगवान कांबळी, तेजस सोमण, तुषार बांदेकर, संतोष मेस्त्री, शंकर कोठावळे, प्रशांत मयेकर, बाळा दळवी, महेश नाईक, नारायण बंगे, राजीव हरयाण, दत्तप्रसाद शेणई, गोविंद लाड, जानू वरक, अर्जुन रेडकर, रवींद्र सावंत, निळकंठ सावंत, प्रथमेश सावंत, गुंडू सावंत, हरी सावंत, भरत मेस्त्री, योगेश कोंडुरकर, लक्ष्मण पेडणेकर, संदेश वेंगुर्लेकर, नारायण मेस्त्री, संजय भरडकर, गणपत पेडणेकर, महेश्वर गवंडे, राधाकृष्ण नाईक, चारुदत्त तेंडोलकर आदींसह दशावतार कलाकार उपस्थित होते.