रशिया-चीनकडून सागरी भुयारीमार्गाची योजना
17 किलोमीटर लांब भुयारीमार्गाने रशियाला क्रीमियाशी जोडणार : चिनी कंपनी सीआरसीसीकडून यासंबंधी महत्त्वाचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया आणि चीन हे समुद्रात एक गुप्त भुयारीमार्ग तयार करण्यासंबंधी चर्चा करत आहेत. 17 किलोमीटर लांबीचा हा भुयारीमार्ग रशियाला क्रीमियाशी जोडणार आहे. दोन्ही देशांच्या उद्योजकांनी रशिया-क्रीमिया भुयारीमार्ग प्रकल्पावर चर्चा केली आहे. क्रीमियाच्या रशियातील समावेशाला चीनने अद्याप मान्यता दिलेली नाही. तरीही चीन या भागात प्रकल्पाकरता रशियाला साथ देण्याचा विचार करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रशियाने 2014 मध्ये क्रीमियावर कब्जा केला होता. चीनने अद्याप या कब्जाला मान्यता दिलेली नाही.
रशिया आणि चीन समुद्रातील भुयारी मार्गावर चर्चा करत असून तो कर्च ब्रिजचा पर्याय ठरणार असल्याचे मानले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान 8 ऑक्टोबर 2022 रोजी युक्रेनियन सैनिकांनी कर्च ब्रिजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ब्रिजचा एक हिस्सा तुटून कोसळला होता.
चीनची सरकारी कंपनी सक्रीय
चायनीज रेल्वे कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने स्वत:चे कर्मचारी क्रीमियामध्ये रेल्वे आणि रस्तेमार्ग तयार करण्याशी निगडित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. सीआरसीसी ही चीनची सरकारी कंपनी आहे. रशियन उद्योजक ब्लादिमीर कलयुजनी यांनी भुयारीमार्ग प्रकल्पासाठी ठेकेदार म्हणून काम करण्यास रुची दाखविल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कलयुजनी यांनी हा दावा फेटाळला. रशिया आणि सीआरसीसी यांच्यात कुठल्याही प्रकारचे सहकार्य नसल्याचे कलयुजनी यांनी म्हटले.
कर्च ब्रिज रशियासाठी महत्त्वपूर्ण
क्रीमियाला जोडणारा कर्च ब्रिज हा सैन्य स्वरुपात रशियासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचमुळे युक्रेनकडून या ब्रिजला लक्ष्य करण्यात आल्यावर रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये 80 हून अधिक क्षेपणास्त्रs डागली होती. रशियाने 2014 मध्ये युक्रेनचा भूभाग असलेल्या क्रीमियावर कब्जा केला होता. यानंतर या भूभागाला रशियाशी जोडण्यासाठी समुद्रात कर्च ब्रिज उभारला होता. या ब्रिजला क्रीमियावरील रशियाच्या कब्जाचे प्रतीक मानले जाते.
युरोपमधील सर्वात लांब ब्रिज
रशियाला क्रीमियाशी जोडणारा कर्च ब्रिज हा युरोपमधील सर्वात लांब ब्रिज आहे. याची लांबी 19 किलोमीटर इतकी आहे. याला क्रीमिया ब्रिज देखील म्हटले जाते. मे 2018 मध्ये रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी याचे उद्घाटन केले होते. रशियाने हा ब्रिज 30 हजार कोटी रुपये खर्चून तयार केला आहे. या ब्रिजवर दोन रेल्वेमार्ग आणि चारपदरी रस्ता आहे. या ब्रिजची निर्मिती पुतीन यांचे निकटवर्तीय अर्कडी रोटेनबर्ग यांच्या कंपनीने केली आहे.
रशियाकडून चीनचा अनुनय
2022 मध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे हिवाळी ऑलिम्पिकसाठी बीजिंगमध्ये पोहोचले होते. तेथे त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांनी तैवानला चीनचा अविभाज्य भाग मानले होते. तसेच तैवानच्या कुठल्याही स्वरुपातील स्वातंत्र्याच्या दाव्याला रशिया नाकारत असल्याचे म्हटले होते. याच्या बदल्यात चीनने देखील युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाचे समर्थन केले आहे. चीन आणि रशिया यांच्यात 2700 मैल लांब सीमा आहे.