टोकिओत विमानांची टक्कर, प्रवासी सुरक्षित
पाच विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू, भूकंपापाठोपाठ जपानमध्ये दुसरी दुर्घटना
वृत्तसंस्था / टोकिओ
भीषण भूकंपापाठोपाठ जपानमध्ये विमानांची टक्कर होण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत दोन्ही विमानांमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तथापि, एका विमानातील पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. टोकिओच्या विमानतळावरील धावपट्टीवर हा अपघात घडल्याची माहिती नंतर देण्यात आली आहे.
जपानची राजधानी असणाऱ्या टोकिओच्या हनेडा विमानतळावर मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. जपान एअरलाईन्सचे एअरबस ए 350 हे विमान या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले होते. ते होकायडोच्या विमानतळावरुन येथे आले होते. ते वेगाने पुढे जात असताना अचानक धावपट्टीवरुन घसरले. त्याचा धक्का जपानच्याच सागरी सैनिकांच्या एका विमानाला लागला. हे विमान धावपट्टीच्या जवळ थांबले होते. धडक झाल्यानंतर प्रवासी विमानाला प्रचंड आग लागली. तथापि, विमानतळावरील कर्मचारीवर्गाने वेगाने हालचाली करुन या विमानातील सर्व 379 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या प्रवाशांमध्ये 12 विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. सागरी सैनिकांच्या विमानातील 5 कर्मचारी मात्र, दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले. हनेडा हा टोकिओतील सर्वात गर्दीचा विमानतळ आहे. विशेषत: वर्ष अखेर आणि नववर्षाचा प्रारंभ या कालावधीत या तळावरुन विमानांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. त्यामुळे काहीवेळा दाटीवाटीने विमाने उभी करावी लागतात. हेच या टकरीचे प्रमुख कारण असावे, असे प्राथमिक अनुमान वर्तविले गेले आहे.
आगीचा भडका
धडकेनंतर लागलेल्या भीषण आगीत प्रवासी विमान पूर्णत: जळून गेले. त्याचा अक्षरश: कोळसा झाला. पण त्याआधीच सर्व प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी विमानातील कोणाचीही जीवीत हानी झाली नाही. सोशल मिडीयावर या आगीचे व्हिडीओ लगोलग प्रसिद्ध होऊ लागले होते. एवढ्या मोठ्या आगीतून सर्व प्रवासी सुखरुप बाहेर कसे काढण्यात आले, यावर अनेकांनी आश्चर्य, त्याच प्रमाणे आनंदही व्यक्त केला आहे.
चौकशीचा आदेश
अपघात झाल्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच, अपघाताची सर्व माहिती वेळोवेळी लोकांना देण्याचा आदेशही दिला आहे. परिस्थितीचे आकलन करुन घ्यावे आणि त्यानुसार ज्यांना आवश्यक आहे, त्यांना साहाय्य करावे, अशी सूचना त्यांनी केली.
विमानतळ काही वेळासाठी बंद
विमानाला आग लागल्यानंतर हनेडा विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आला होता. विमान पूर्ण जळल्यानंतर त्याला तेथून हटविण्यात आले. सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली. दुसरे विमानही हटविण्यात येऊन धावपट्टी मोकळी करण्यात आली. त्यानंतर साधारणत: दोन तासांनी तळ पुन्हा सुरु झाला.
दोन्ही चालक वाचले
प्रवासी विमान आणि सागरी सैनिकांचे विमान या दोन्ही विमानांचे चालक या भीषण अपघातातून वाचले आहेत. सागरी सैनिकांच्या विमानाचा चालक वेळीच विमानातून बाहेर उडी मारल्याने वाचला. मात्र या विमानातील पाच कर्मचारी दुर्दैवी ठरले आहेत, अशी माहिती विमानतळाच्या व्यवस्थापनाने दिली.
भीषण अपघात, पण दैव बलवत्तर
ड टोकिओच्या विमानतळावर टक्करीनंतर प्रवासी विमानाला भीषण आग
ड तशा आगीतूनही या प्रवासी विमानातील सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका
ड जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्याकडून अपघाताच्या चौकशीचा आदेश
ड सोशल मिडियावर भीषण आगीची दृष्ये प्रसिद्ध, सुटकेसंबंधी आश्चर्य