अमेरिकेत विमान-हेलिकॉप्टर टक्कर
सर्व 64 प्रवासी ठार झाल्याची भीती, 30 मृतदेह हाती : चौकशीचा आदेश
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील रेगन विमानतळानजीक अमेरिकन एअरलाईन्सचे प्रवासी विमान आणि अमेरिकेच्या सेनेचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर यांची हवेत टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचा चेंदामेंदा झाला आणि ते जवळच्या पोटोमॅक नदीत कोसळले. त्यापाठोपाठ अपघातग्रस्त प्रवासी विमानही याच नदीत कोसळले, अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेत 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून बचावकार्य केले जात आहे. ही घटना अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या ‘व्हाईट हाऊस’पासून तसेच अमेरिकेची संसद असणाऱ्या कॅपिटॉल हिल परिसरापासून पाच किलोमीटरच्या अंतरात घडली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
प्रवासी विमानात 64 प्रवासी होते. तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. आतापर्यंत 30 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त तेथील प्रशासनाने दिले आहे. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. अमेरिकेच्या आपत्कालीन साहाय्यता दलाच्या अनेक नौका नदीत बचाव कार्य करीत आहेत. हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. बचावकार्यात साहाय्यता दलाच्या हेलिकॉप्टर्सनीही भाग घेतला असून नदीच्या तळापर्यंत जाऊन शोधकार्य करण्यात येत आहे. या घटनेत 60 हून अधिक मृत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून हेलिकॉप्टरमधील सैनिकांचा समावेश शक्य आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ
या टकरीचे व्हिडीओचित्रण अनेक लोकांनी केले असून ते युट्यूब आणि इतर माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. या घटनेची भीषणता या चित्रणातून दिसून येत आहे. टकरीनंतर विमान आणि हेलिकॉप्टर यांना प्रचंड आग लागली. दोन आगीचे गोळे पहिल्यानंतर अनेकांची भीतीने गाळण उडाली होती. काही मिनिटांमध्येच हे आगीचे गोळे नदीत पडतानाही अनेकांनी पाहिले होते.
विमान प्राधिकारणाकडून माहिती
या घटनेची सविस्तर माहिती अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिली आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. रेगन विमानतळापासून साधारणत: 400 फूट उंचीवर ही टक्कर झाली. या स्थानापासून कॅपिटॉल हिल आणि व्हाईट हाऊस पाच किलोमीटरच्या अंतरात आहे. प्रवासी विमान कान्सास प्रांतातील विशिटा येथून वॉशिंग्टन येथे येत होते. हे विमान रेगन विमानतळावर उतरण्याच्या बेतात असताना त्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली. यावेळी विमानाचा वेग साधारणत: 225 किलोमीटर प्रतितास इतका होता. टक्कर झाल्यानंतर दोन मिनिटांच्या आतच विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळले.
अत्यंत सुरक्षित भागात...
ही दुर्घटना अमेरिकेच्या अत्यंत सुरक्षित आणि अतिनियंत्रित भागात झाल्याने तो अधिकच चिंतेचा विषय बनला आहे. याच परिसरात अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान आणि संसद सभागृहे असल्याने येथे विमाने आणि कोणत्याही उडत्या साधनांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. अत्याधुनिक वायू प्रवास नियंत्रण सामग्री येथे बसविण्यात आली आहे. तरीही हा अपघात झाल्याने आश्चर्यासह चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी करण्यात यावी, असा आदेश वॉशिंग्टनच्या प्रशासनाने त्वरित काढला आहे.
डोनाल्ड ट्रम्प संतप्त
अमेरिकेच्या सर्वात सुरक्षित आणि नियंत्रित भागात अशी दुर्घटना घडल्यामुळे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघात टाळण्यासाठी हेलिकॉप्टर बाजूला किंवा वर किंवा खाली का नेण्यात आले नाही, अशी विचारणा त्यांनी केली असून कोणाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली त्याची त्वरित चौकशी व्हावी अशी सूचना त्यांनी केली. प्रवासी विमान रेगन विमानतळावर उतरत असताना त्याला कमी लांबीच्या धावपट्टीवर उतरण्याची सूचना नियंत्रण मनोऱ्यावरुन करण्यात आली होती. ही सूचना ऐनवेळी, अर्थात, घटनेच्या आधी काही मिनिटेच करण्यात आली होती. ही सूचना घटनेला कारणीभूत ठरली आहे का, अशीही शंका अमेरिकेतील अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत.
घटनेमुळे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह...
- प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टर यांच्या टकरीचे जगभर तीव्र पडसाद
- डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया, सखोल चौकशी करण्याची सूचना
- अमेरिकेच्या अत्यंत सुरक्षित भागात घटना घडल्याने अनेकांना आश्चर्य