For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कानपूरमध्ये विमान कोसळले; पायलटसह प्रशिक्षणार्थी ठार

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
कानपूरमध्ये विमान कोसळले  पायलटसह प्रशिक्षणार्थी ठार
Advertisement

मृतांपैकी एकजण कर्नाटकातील : स्फोट झाल्यानंतर दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/कानपूर

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी दुपारी एक प्रशिक्षण विमान अचानक कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. मृत वैमानिकांची ओळख अभिषेक पुजारी (कर्नाटक) आणि सुमित भाटिया (गुजरात) अशी पटली आहे. गंगा नदीच्या काठावरील नत्था पूर्वा गावाजवळ, एका मोठ्या स्फोटासह विमान जमिनीवर कोसळले. विमान कोसळण्याचा आवाज ऐकून जवळच्या गावातील लोक घाबरले आणि घराबाहेर धावले. स्थानिक लोकांनीच यासंबंधी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मदत व बचावकार्य राबविण्यात आले. अपघातग्रस्त विमान टेक्नाम कंपनीचे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Advertisement

कानपूरमधील ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नत्था पूर्वा गावात गंगा नदीच्या काठावरील शेतात विमान कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. दुर्घटनेनंतर गावकरी घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागही हादरला. पोलीस आयुक्त रघुवीर लाल आणि पोलीस उपायुक्त अतुल कुमार श्रीवास्तव आपल्या पथकांसह घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळ सुरक्षित करून मदत आणि बचावकार्य सुरू केले. या घटनेची माहिती डीजीसीएला देण्यात आली आहे. याप्रकरणी एक पथक तांत्रिक आणि दुसरे पथक सविस्तर तपास करत आहे.

ग्वालटोलीच्या बाहेरील गर्ग एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमधून सकाळी सुमारे 11:30 वाजता उड्डाण केलेले चार आसनी, दुहेरी इंजिन असलेले टेक्नाम कंपनीचे विमान 11:50 वाजता कोसळल्याचे घटनास्थळी दाखल झालेले पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी सांगितले. उड्डाणादरम्यान अचानक एक मोठा स्फोट झाल्यामुळे विमान अनियंत्रितपणे खाली कोसळले. अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून विमानाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. घटनास्थळी धूर आणि विमानाचे अवशेष पसरल्याचे दिसून येत आहेत.

प्रशिक्षक-प्रशिक्षणार्थी अशा दोघांचाही मृत्यू

या विमान अपघातात गुजरातचे रहिवासी असलेले प्रशिक्षक सचिन भाटिया आणि कर्नाटकचे रहिवासी असलेले प्रशिक्षणार्थी अभिषेक पुजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या भीषण अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा ताबा घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.

Advertisement
Tags :

.