कॅनडात कोसळले विमान, 6 जणांचा मृत्यू
मृतांमध्ये खाण कामगारांचा समावेश
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडामध्ये खाणकामगारांना खाणीच्या ठिकाणी नेण्यासाठी उड्डाण केलेले छोटे विमान कोसळले आहे. उत्तर कॅनडाच्या दुर्गम भागात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातून किती जण प्रवास करत होते याची अचूक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. आम्ही अधिकाऱ्यांसोबत मिळून नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत असे वक्तव्य रियो टिंटो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅकब स्टॉशोल्म यांनी केले आहे.
खाण कामगारांना खाणीच्या ठिकाणी नेण्यासाठी या विमानाने उड्डाण केले होते अशी माहिती नॉर्थवेस्टर्न एअरने दिली आहे. या दुर्घटनेप्रकरणी तपास हाती घेण्यात आला असून फोर्ट स्मिथ येथील सर्व उड्डाणे काहीवेळ रोखण्यात आली आहेत. कॅनडाच्या परिवहन सुरक्षा मंडळाने दुर्घटनेच्या तपासासाठी एक पथक तैनात केले आहे. आर.जे. नॉर्थवेस्ट टेरिटरिजचे प्रमुख सिम्पसन यांनी दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.