भारतीय वैमानिकामुळे टळला ‘प्लेन’ अटॅक
दुबईहून इस्रायलला चाललेल्या विमानात हायड्रामा, ओमानच्या सहवैमानिकाकडून चाकूचे वार, विमान सुखरुप
वृत्तसंस्था/ तेल अवीव
दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवला चाललेल्या प्रवासी विमानामध्ये, अभूतपूर्व प्रसंग घडला आहे. या विमानाचा मुख्य चालक भारतीय आहे. हे विमान आकाशात असताना भारतीय वैमानिकाला ओमानच्या सहवैमानिकाने चाकूने भोसकले. तथापि, या भारतीय वैमानिकाने तशाही स्थितीत विमानावर नियंत्रण मिळवून ते सौदी अरेबियात सुखरुप उतरविले. त्यामुळे विमानातील सर्व 174 प्रवासी सुस्थितीत आहेत. ओमानी वैमानिकाची हे विमान 9/11 हल्ल्याप्रमाणे इस्रायलमधील एखाद्या ठिकाणी आदळवायची योजना होती, असे समोर आले आहे. या प्रसंगाची सखोल चौकशी केली जाणार आहे. हे विमान फ्लायदुबई या कंपनीचे आहे. या विमानातील प्रवासी मुख्यत्वेकरुन इस्रायली होते. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हे ‘फ्लायदुबई’ कंपनीचे प्रवासी विमान बुधवारी सकाळी दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे जाण्यास निघाले. हे विमान जॉर्डन या देशाच्या आकाशात असताना विमानाच्या दोन चालकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यांच्यात अक्षरश: मारामारी झाल्याने भूमीवरील नियंत्रण कक्षाकडे विमानाचे अपहरण होत असल्याचा संदेश देण्यात आला. याचवेळी ओमानी वैमानिकाने आपल्या हातातील सुरीने भारतीय मुख्य वैमानिकाला मोसकले, असा घटनाक्रम समोर आला आहे. हा आणिबाणीचा संदेश असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, विमान जॉर्डनवरुन पुन्हा माघारी वळविण्यात आले. त्याचे अवतरण सौदी अरेबियात, आदेशानुसार करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
घातपाताचा दाट संशय
या विमानचे हायजॅकिंग (विमान पळविणे) करण्यात येत नव्हते. तर ते पाडविण्याचाच विचार ओमानी वैमानिकाचा होता, असे दिसून येत आहे. विमानातून प्रथम धोक्याचा संदेश पाठविण्यात आला होता. तथापि, नंतर सामान्य आणिबाणीचा संदेश पाठविण्यात आला. त्यामुळे तणाव काही प्रमाणात दूर झाला होता. तरीही चिंतेचे वातावरण राहिलेच होते. अखेर विमान सुखरुप उतरवले गेले.
वैमानिकाच्या शरीरावर रक्त
विमानातून दोन्ही वैमानिक बाहेर पडले तेव्हा. भारतीय वैमानिकाच्या शरीरावर रक्त दिसून येत होते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. दोन्ही वैमानिकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यात मारामारी कोणत्या कारणांवरुन झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, हा प्रकार गंभीर असून कठोर कृती केली जाईल, असे इस्रायलकडून स्पष्ट केले गेले. या भारतीय वंशाच्या वैमानिकाचे नाव अद्याप सुरक्षेच्या कारणास्तव उघड करण्यात आलेले नाही. इस्रायली सेना या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे. 
इस्रायलच्या नेत्यांकडून गंभीर नोंद
इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून त्यांच्या कार्यालयाकडून बुधवारी दुपारी एका निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. आता स्थिती पूर्णत: नियंत्रणात असून झालेला प्रकार दहशतवादाचा नसल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या विमानातील सर्व इस्रायलली नागरीक सुरक्षित आहेत, हा संदेशही या निवेदनातून देण्यात आला आहे. इस्रायलच्या सेनेकडूनही या संबंधी निवेदन देण्यात आले आहे. इस्रायली सेनेचे प्रमुख इयाल जमीर यांनी अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांसमावेत बैठक करुन या घटनेची व्यापक समीक्षा केली आहे. त्यांनी एकंदरीच सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला.
विमानात किती प्रवासी...
‘फ्लायदुबई’च्या विमानात एकंतर विमान कर्मचारी धरुन एकंतर 174 प्रवासी होते. त्यांच्यात 27 बालकांचाही समावेश होता. विमानात हा प्रकार होत असताना हे सर्व प्रवासी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होते. तथापि, विमान सुखरुप उतरल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. काही प्रवाशांनी या घटनेसाठी वैमानिकांना दोष दिला आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
प्रवाशांचा जीव टांगणीला...
ड विमानात वैमानिकांची हाणामारी झाल्याने प्रवाशांची काहीकाळ घाबरगुंडी
ड विमान पळविण्यात येत असल्याचा संदेश आल्याने दिला सुरक्षा रेड अलर्ट
ड वैमानिकाने दुसऱ्याला भोसकल्याचे स्पष्ट विमान पाडविण्याचे होते कारस्थान
ड मुख्य वैमानिक भारतीय वंशाचा, त्याला ओमानच्या वैमानिकाने भोसकले
ड सखोल चौकशी करण्याचा इस्रायलचा आदेश, दहशतवादी घटना शक्य