For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावांचे नियोजन करून स्थलांतर करा

11:31 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावांचे नियोजन करून स्थलांतर करा
Advertisement

गवाळी, कोंगळा, पास्टोली ग्रामस्थांची मागणी : शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेणार : आमदार विठ्ठल हलगेकर यांचे आश्वासन

Advertisement

खानापूर : भीमगड अभयारण्य क्षेत्रातील नऊ गावांचे स्थलांतर करण्याचे नियोजन सरकार करत आहे. यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा करण्यात येत आहे. त्यामुळे भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावच्या ग्रामस्थांतून स्थलांतराबाबत योग्य नियोजन होईल की नाही, या भीतीखाली ते वावरत आहेत. यासाठी गवाळी, कोंगळा, पास्टोली या गावच्या ग्रामस्थांनी सोमवारी खानापूर येथे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन स्थलांतराबाबत चर्चा केली. आणि योग्य नियोजन केल्यास आम्ही स्थलांतरास तयार आहोत. अन्यथा आम्हाला आहे त्या ठिकाणी मुलभूत सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.

भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गवाळी, कोंगळा, पास्टोली, मेंढील यासह नऊ गावांचा भीमगड अभयारण्य क्षेत्रात समावेश आहे. त्यामुळे या गावांच्या मुलभूत सुविधा पुरविण्यास वनखाते आडकाठी करत आहेत. त्यामुळे वीज, रस्ते, पाणी या समस्या गंभीर बनल्या आहेत. त्यामुळे भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावांचा स्थलांतराचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने समोर आणला आहे. मात्र स्थलांतर करताना योग्य नुकसानभरपाई देवून त्यांचे योग्यरितीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तळेवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देवून स्थलांतराबाबत तळेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेतले आहे.

Advertisement

यातील अनेकानी स्थलांतराला होकार दर्शविल्याने इतर गावांचाही स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कोंगळा, पास्टोली, गवाळी या गावच्या ग्रामस्थांनी सोमवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन स्थलांतराबाबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी आमचे स्थलांतर आमची पंचायत असलेल्या शिरोली ग्राम पंचायत क्षेत्रातच नदीच्या अलीकडे करण्यात यावे, तसेच आम्हाला योग्य नुकसानभरपाई आणि घर बांधण्यासाठी जागा आणि घर बांधून देण्यात यावे, यासह सर्व मुलभूत सुविधा पुरवून आमचे स्थलांतर करण्यात यावे, अन्यथा आम्ही आहे त्या ठिकाणी आमची शेकडो वर्षाची परंपरा जपत आम्ही निसर्गाशी जुळवून जीणे जगत आहोत. सर्व मुलभूत सुविधा आहे त्या ठिकाणी दिल्यास आमचा स्थलांतराचा प्रश्नच येत नाही. अशीही प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यावेळी कोंगळा येथील जयंत गावडा म्हणाले, आम्हाला लागून असलेल्या जोयडा तालुक्यातील दुर्गम भागातील गावात सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना मात्र वनखात्याच्या काटेकोर नियमामुळे मुलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. तालुक्यातील गावांचेच स्थलांतर का, आमच्यापेक्षा दुर्गम असलेल्या जोयडा तालुक्यातील होळडा, पालडा, विरंजोळ, रंगारुक, वटला, करंबळ, वर्लेवाडी, मेडा यासह अतिशय दुर्गम गावांना सर्व सुविधा पुरविल्या आहेत. मात्र खानापूर तालुक्यातील गावांना सुविधा न पुरविता स्थलांतराचा प्रस्ताव का, असाही सवाल जयंत गावडा यांनी उपस्थित केला. शिरोली ग्रा.पं.च्या सोमवारी झालेल्या बैठकीत स्थलांतराबाबत ठराव संमत करण्यात आला आहे.

16 रोजी शिवस्मारक सभागृहात सर्वपक्षीय बैठक

यावेळी आमदारांनी गावकऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली. जर स्थलांतराला तुमची संमती असल्यास तसेच तुम्हाला योग्य नुकसानभरपाई, तुमचे योग्य पुनर्वसन होणार असल्याची खात्री झाल्यावरच स्थलांतराचा प्रस्ताव आम्ही स्वीकारुया, यासाठी सर्वपक्षीय बैठक शुक्रवार दि. 16 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथील सभागृहात सकाळी 11 वाजता बोलावून यावेळी सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आमदार विठ्ठल हलेगकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.